
अमित खोत, मालवण
दोन महिन्यांच्या बंदी कालावधी नंतर मच्छिमार पुन्हा नव्या दमाने मासेमारीसाठी सज्ज झाला आहे. १ ऑगस्ट पासून नव्या मासेमारी हंगामाची सुरवात होणार असून किनारपट्टीवर लगबग वाढली आहे. दरम्यान नवा मासेमारी हंगाम सुरू होत असला तरी मत्स्य विभागाकडे गस्ती नौका प्राप्त झाली नाही. तर मत्स्य अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे परराज्यातील नौका व अनधिकृत मासेमारी वाढून संघर्षाची भीती व्यक्त होत आहे.
गेली तीन वर्षे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १ जून ते ३१ जुलै असा एकसमान निश्चित करण्यात आला आहे.त्यानुसार दोन महिने बंदी कालावधी नंतर नव्या मासेमारी हंगामास सुरवात होत आहे. किनारपट्टीवर मच्छिमार वर्ग जाळी विणने, बोटींची दुरुस्ती आदी कामात गुंतला आहे. त्यात समुद्रही काहीसा शांत असल्याने मासेमारी हंगामाची सुरवात आश्वासक होईल या अपेक्षेने मच्छिमार वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र पावसाळी हंगाम सुरू असल्याने मासेमारी बंदी उठली तरी सुरवातीला छोट्या होड्या समुद्रात मासेमारीसाठी उतरतील असे बोलले जात आहे.
नारळी पोर्णिमेनंतरच मासेमारीचा श्रीगणेशा
किनारपट्टीवर पारंपरिक प्रथेनुसार नारळी पोर्णिमेला समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्या नंतरच नव्या मासेमारी हंगामाची सुरवात केली जाते. तोपर्यंत समुद्र पूर्णपणे शांत होतो. याचा विचार करता २५ ऑगस्ट नंतरच मोठ्या नौका समुद्रात लोटल्या जातील असे बोलले जात आहे.
अधिकाऱ्यांची पदेही रिक्त ; गस्ती नौकेचीही प्रतीक्षा
सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक मत्स्य आयुक्त, दोन मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी व वेंगुर्ला परवाना अधिकारी अशी चार महत्वाची पदे रिक्त आहेत. तर अनधिकृत व परराज्यातील मासेमारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी असणारी गस्ती नौका अद्यापही वरिष्ठ कार्यालयाकडून मत्स्य विभागाला प्राप्त न झाल्याची माहिती मत्स्य विभाग अधिकारी यांनी दिली आहे.
पोलिसांच्या स्पीड बोटीही बंद
गतवर्षी पोलिसांच्या स्पीड बोटींनी अनेक अनधिकृत मासेमारी नौका पकडून मत्स्य विभागाच्या ताब्यात दिल्या होत्या. मात्र पोलिसांना समुद्रातील ५ नॉटिकल मैल क्षेत्रपर्यंत बोट नेता येते त्यामुळे १२ नॉटिकल मैल क्षेत्रात सुरू असलेल्या मासेमारीवर लक्ष ठेवणे व किनारपट्टीची सुरक्षाही पाहणे पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे.
…..तर स्पीड बोट समुद्रात उतरणार
परराज्यातील मासेमारी नौकांची वाढती घुसखोरी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिसून आल्यास व स्थानिक मच्छिमारांसोबत संघर्षाची स्थिती उद्भवल्यास समुद्री हवामानाचा अंदाज घेत स्पीड बोट समुद्रात उतरवल्या जातील. अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली आहे.































































