
सामना ऑनलाईन, मुंबई
राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत तज्ञ समितीची तसेच सचिव पातळीवर तातडीने बैठक बोलावून त्वरित सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेच्या आमदारांना दिले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांशी प्रदीर्घ चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण तातडीने मिळण्याची जोरदार मागणी यावेळी शिवसेना आमदारांनी केली.
या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. मराठा समाज विधिमंडळाकडे आशेने बघत आहे. आरक्षणाच्या मुद्दय़ावर संपूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न बघता तातडीने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली.
सकारात्मक निर्णयाचे आश्वासन
मराठा समाजाचा अंत पाहू नका. दिवसेंदिवस आंदोलन अधिक वाढेल. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न बघता विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे. याचबरोबर मुस्लिम, धनगर, जंगम समाजही आहे. या समाजाच्या नेत्यांनाही बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी. जेव्हा विशेष अधिवेशन बोलावले जाईल तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कोणाचाही आक्षेप नसेल अशा पद्धतीने त्याआधीच निर्णय घेतला जावा अशा पद्धतीची यावेळी चर्चा झाली. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण कसे मिळेल या अनुषंगाने तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेना आमदारांनी यावेळी s केल्याचे रामदास कदम म्हणाले. त्यावर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत तातडीने तज्ञ समितीची आणि सचिवांची बैठक बोलावून तातडीने सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे कदम म्हणाले.
























































