१ ऑक्टोबरपासून मुलुंड डंपिंग ग्राउंड बंद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील कचरा मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येणारे मुलुंड डंपिंग ग्राऊंड १ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. यातच कांजूर आणि देवनार डंपिंग ग्राऊंडची क्षमताही संपत आल्याने आगामी काळात मुंबईतील कचरा कुठे टाकणार असा प्रश्न पालिकेसमोर उभा राहणार आहे.

 मुंबईत दिवसाला ७,२०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. जमा होणारा कचरा मुलुंड, कांजूर व देवनार डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. मात्र सद्यस्थितीत मुलुंड डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपत आली आहे. त्यातच पुढील सहा वर्षांकरिता पालिकेने सुमारे ७३१ कोटी रुपये खर्च करत मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचरा उचलण्याचे कंत्राट फेब्रुवारी २०१८ मध्ये दिले आहे. स्थायी समितीनेही ७३१ कोटी रुपयांच्या कंत्राटाला मंजुरी दिली आहे.

परंतु प्रशासनाने आता १ ऑक्टोबरपासून मुलुंड डंपिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ७३१ कोटी रुपयांच्या कंत्राटाचे काय करणार, असा प्रश्न उपस्थित निर्माण होणार आहे.

‘देवनार’ बंद करण्याच्या हालचाली

देवनार डंपिंग ग्राऊंडवर वारंवार लागणाऱया आगी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे हे डंपिंग ग्राऊंडही काही काळात पालिकेला बंद करावे लागणार आहे. यातच कांजूर डंपिंग ग्राऊंडची कचरा साठवून घेण्याची क्षमता १,५०० मेट्रिक टन इतकीच आहे. त्यामुळे भविष्यात कांजूर डंपिंग ग्राऊंडही बंद करण्याची वेळ येऊ शकते. यातच मुलुंड डंपिंग ग्राऊंड बंद झाल्यानंतर हा कचरा देवनार आणि कांजूर डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही डंपिंग ग्राऊंडची क्षमताही लवकरच संपण्याचा धोका आहे.