स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नापासांना पास करणारे रॅकेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नापास विद्यार्थ्यांना पास करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात कुलगुरुंकडे तक्रारी करुनही ते दखल घेत नाहीत. त्यामुळे थेट राज्यपालांकडेही आपण तक्रार केली आहे अशी माहिती युवासेनेचे सहसचिव, सिनेट सदस्य प्रा.सुरज दामरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. विद्यापीठाच्या परिक्षा विभागाची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच याबदद्ल राज्यपालांकडे तसेच शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

दरम्यान , या महाविद्यालयातील एका प्राध्यापकाच्या मुलीचे थेट गुण वाढवण्यात आलेले आहे. तब्बल सहा वेळा पुर्नमुल्यांकन करण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या त्या विद्यार्थीनीचे १० ते २० या फरकाने गुण वाढवण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परिक्षेत जेवढे गुण मिळालेले आहेत त्यापेक्षा परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनीस प्रात्यक्षिक परिक्षेत अधिक गुण देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही घडलेला आहे.

मॉडरेटरने तपासलेल्या उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लाऊन पुन्हा त्या उत्तरपत्रिका दुसऱ्याच मर्जीतला मॉडरेटरकडून तपासून घेणे व गुण वाढवून घेणे असे धक्कादायक प्रकार विद्यापीठात होत आहेत. या संदर्भातील सर्व पुरावे आपण कुलगुरुच्या समोर ठेऊन कारवाई करण्याची मागणी केली असतानाही कुलगुरुंनी त्याची साधी दखल घेतलेली नाही. तसेच या विद्यापीठाच्या एकाच प्राध्यापकाने जवळपास ४० विषयांच्या उत्तरपत्रिका तपासल्याचेही उघड झाले आहे. असेही दामरे यांनी म्हटले आहे.

विद्यापीठाचे परिक्षा विभाग, परिक्षा नियंत्रकाचे काम करणारे मान्यवर हा सर्व सावळा गोंधळा घालत आहेत. सर्व पुरावे देऊनही कुलगुरुनी कुठलीही कारवाई केली नाही. यामुळे राज्यपालांकडे तसेच शिवसेना नेते तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. असे दामरे यांनी म्हटले आहे. याबदद्ल विद्यापीठाची चौकशी केली जावी अशी मागणी प्राध्यापक सुरज दामरे यांनी केली आहे. तसेच परिक्षा नियंत्रकास तत्काळ निलंबित करण्यात यावे, खाजगी संस्थेला देण्यात आलेले परिक्षा तपासणीचे केंद्र बंद करुन ते विद्यापीठाच्या उपकेंद्रात सुरु करावे अशी मागणीही करण्यात आली आहे.