हॉटेल ‘ग्रॅण्ड हयात’मध्ये भरघोस वेतनवाढीचा करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सांताक्रुझ येथील पंचतारांकित हॉटेल ‘ग्रॅण्ड हयात’मधील कर्मचाऱयांच्या वेतनात कमीत कमी आठ हजार ते जास्तीत जास्त १६ हजार रुपये वाढ मिळवून देणारा भरघोस पगारवाढीचा करार भारतीय कामगार सेनेने हॉटेलच्या व्यवस्थापनाबरोबर नुकताच यशस्वीरीत्या केला.

हा करार भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली चिटणीस मनोज धुमाळ आणि भा. का. सेना हयात युनिट कमिटीने व्यवस्थापनाशी केला. या करारानुसार ५० टक्के पीएलचे वर्ष अखेरीस रोखीत रूपांतर करण्यास मुभा, कुटुंबातील व्यक्ती दगावल्यास तातडीचा मदत निधी २० हजार, दोन लाखांची मेडिक्लेम पॉलिसी, वैद्यकीय भत्ता १२ हजार, सहलीसाठी १२०० रुपये, कामावर असताना किंवा बाहेर नैसर्गिक मृत्यू झाल्यास कामगाराच्या वारसाला २ दिवसांचा पगार व सर्व कामगारांचा १ दिवसांचा पगार अशी एकत्रित रक्कम देणार. कामगारांची १०-१२ वी उत्तीर्ण मुले, मुली, पाल्यांना १५ हजारांची शिष्यवृत्ती, मॅटर्निटी लिव्ह १५ दिवस, क्रेडिट सोसायटी सुरू करण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून १० लाख रुपये, सणासाठी आगाऊ रक्कम १२ हजार आणि कुर्ला रेल्वे स्टेशन ते हयात हॉटेलपर्यंत कामगारांसाठी बससेवा सुरू केली आहे, अशी माहितीही मनोज धुमाळ यांनी दिली. या करारावर भारतीय कामगार सेनेतर्फे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, चिटणीस मनोज धुमाळ, हॉटेल व्यवस्थापनातर्फे उपाध्यक्ष सुरेश अग्रवाल, संचालक विद्याशंकर (एचआर), सरव्यवस्थापक पुनीत सिंग, व्यवस्थापक रोशन राजपाल, भा. का. सेना युनिट कमिटीचे अध्यक्ष प्रशांत नाईक, कार्यकारिणी सदस्य अभय प्रभू, चिटणीस सिद्धेश पांढरकामे, खजिनदार कुश गवस, युनिट कमिटी सदस्य संजय जाधव, संदेश परब, स्नेहा पानखानिया, मंगेश मिस्त्री यांनी स्वाक्षऱया केल्या.