
सामना ऑनलाईन, संभाजीनगर
आरक्षणासह अन्य महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन सहाव्या दिवशी सुरू होते. मराठा तरुणांनी आरक्षणाची मागणी नैराश्यातून केली, असे खोडसाळ विधान केल्याबद्दल संतप्त मराठा समाजबांधवांनी सोमवार, ६ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा जाहीर निषेध करत त्यांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतीकात्मक धिंड काढली. मराठा समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी गडकरींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. शासनाने दोन दिवसांत आरक्षणाची घोषणा न केल्यास क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरणार असून, जिल्हाभरात चक्का जामसह संपूर्ण जिल्हा कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे.
बेमुदत ठिय्या आंदोलनात दोन दिवसांत ७०० जणांनी मुंडण केले. उद्यापर्यंत मुंडण आंदोलन सुरू राहणार असून, गावपातळीवर मुंडण आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले. सोमवारी दुपारी आंदोलनस्थळापासून गडकरींच्या पुतळ्याची गाढवावर प्रतीकात्मक धिंड काढण्यात आली. मुक्तेश्वरद्वार, कचेरी रस्त्यावर आंदोलकांनी गगनभेदी घोषणा देऊन आपला रोष व्यक्त केला. आम्ही नैराश्यातून नव्हे, तर काळाची गरज व हक्कांसाठी आरक्षण मागतोय. पण आंदोलनाची दिशाभूल करण्यासाठी गडकरींनी केलेल्या विधानाचा जाहीर निषेध करण्यात आला.
दरम्यान, आंदोलनस्थळी झालेल्या पत्रकार परिषदेत क्रांतिदिनी होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. गुरुवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वस्ती, शिवारातील रस्त्यावर मराठा समाजबांधव गुर-ढोरे, बैलगाड्या, ट्रॅक्टर आदी साहित्य घेऊन उतरणार आहेत. दैनंदिन सर्व कामे रस्त्यावर होणार आहेत. शांततापूर्वक होणाऱ्या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी होऊन पािंठबा द्यावा. विशेष म्हणजे बससेवाही बंद ठेवावी. नसता होणाऱ्या नुकसानीस समाज जबाबदार राहणार नाही, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात शाळा, महाविद्यालये बंद राहतील. केवळ रुग्णालये, औषधी प्रतिष्ठाने सुरू राहणार असल्याचे सांगितले.
पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नये, नसता लोकशाही मार्गाने प्रशासन व मंत्र्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आला. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत शासन दुतोंडी भूमिका घेत असून, सरकारी वकील आंदोलकांना जामीन मिळण्यास विरोध करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी न्याय विभागामार्फत सरकारी वकिलांना आदेश द्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली. खासदार गावीत यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदवत असामाजिक तत्वांचे मराठा समाज समर्थन करत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अलिप्त राहणाऱ्या लोकप्रतिनिधींना काळे फासणार
चक्का जाम आंदोलनात सहभागी न होणाऱ्या लोकप्रतिनिधींना काळे फासण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समितीने घेतला आहे. याच धर्तीवर जिल्ह्यात जे लोकप्रतिनिधी आंदोलनात सहभागी होणार नाहीत, त्यांना काळे फासले जाईल, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
पूर्वतयारीसाठी दोन दिवस बैठका
चक्का जाम व बंद यशस्वीतेसाठी ग्रामीण भागात दौरे करून बैठका घेतल्या जाणार आहेत. रामनगर येथे उद्या दुपारी १२ वाजता, जालना शहराची बैठक मंगळवारी दुपारी १ वाजता आंदोलनस्थळी होईल. गोलापांगरी येथे सायंकाळी ६ वाजता, नाव्हा, देवमूर्ती गटाची बैठक बुधवारी दुपारी माळाचा गणपती येथे होणार आहे.



























































