
सामना प्रतिनिधी । मुंबई
कर्जतमध्ये बांधकामाचे तीन प्रोजेक्ट उभारण्यात येणार असून तेथे परवडणाऱ्या किमतीत फ्लॅट उपलब्ध करून देऊ असे आमिष दाखवून चारजणांनी जवळपास १३४ नागरिकांना कोट्यवधीचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी त्या चौघा भामट्यांना अटक केली आहे.
आरोपींनी दादरच्या सयानी रोडवरील मोतीलाल ओसवाल टॉवरमध्ये आपले कार्यालय थाटले होते. कर्जत येथे ‘कोरल लेक’, ‘लिबर्टी होरायजन’ आणि ‘टी. एम. हार्मोनी’ असे तीन प्रोजेक्ट उभारण्यात येणार असल्याची जाहिरातबाजी आरोपींनी केली होती. त्या प्रोजेक्टमध्ये परवडणारी घरे उपलब्ध करून देऊ असे आमिष त्यांनी नागरिकांना दाखवले होते. २००५ पासून आरोपींनी त्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करवून घेण्यास सुरुवात केली होती. स्वस्तात मस्त घर मिळतेय या आमिषाला भुलून तब्बल १३४ नागरिकांनी कर्जतच्या या प्रोजेक्टमध्ये घरासाठी पैसे गुंतवले. पैसे घेतले पण प्रोजेक्टचा अद्यापपर्यंत काही थांगपत्ताच नाही.
आपली फसवणूक होत असल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात येताच त्यांनी दादर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून प्रोजेक्टचे आमिष दाखवून नागरिकांना कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या चौघा भामट्यांना अटक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.



























































