मध्य प्रदेशच्या धोब्याला ३० लाखांच्या हेरॉईनसह पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

हायप्रोफाईल नशेबाजांना धुंद करण्यासाठी अंधेरी पश्चिमेकडे ब्राऊन शुगरचा (हेरॉईन) साठा घेऊन आलेल्या मध्य प्रदेशातील नामचीन ड्रग्ज सप्लायरला अंबोली पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. एपीआय दया नायक व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई करून या सप्लायरकडून ३० लाख किमतीचा १ किलो ५ ग्रॅम हेरॉईनचा साठा हस्तगत केला आहे.

९ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास एक इसम हेरॉईनचा साठा डिलेव्हरी करण्यासाठी वीरा देसाई मार्गावरील एमरल्ड पार्प इमारतीजवळ येणार असल्याची गुप्त माहिती एपीआय दया नायक यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साळुंखे, एपीआय दया नायक, सावंत, अंमलदार बोमटे, सावंत, चव्हाण, पवार, पाटील, साळवी, गोवारी या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. दुपारी चारच्या सुमारास राकेश गोवर्धनलाल हिलोरिया ऊर्फ धोबी (३२) हा तरुण तेथे प्लॅस्टिकची पिशवी घेऊन आला. हा ड्रग्ज सप्लायर असल्याचे स्पष्ट होताच पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या अंगझडतीत हेरॉईनचा साठा, २०० रुपये आणि आधारकार्डची रंगीत प्रत मिळाली. राकेशला अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ब्राऊन शुगर, कोकेनचा सप्लाय करणाऱ्यांपैकी राकेश एक आहे. तो ‘एनडीपीएस’च्या एका गुह्यात पाहिजे होता पण तो हाती लागत नव्हता. दया नायक यांच्या तो टार्गेटवर होता. अखेर राकेशला पकडण्यात अंबोली पोलिसांना यश आले.