गणेशोत्सव मंडपांसाठीचे अर्ज ऑफलाइनही,कार्यकर्त्यांची मागणी मान्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

गणेश मंडळांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवसेनेने दणका दिल्यानंतर पालिका प्रशासन वठणीवर आले आहे. मंडपांना तातडीने परवानग्या देण्यासाठी ऑनलाइनबरोबरच मंडळांना आता ऑफलाइन अर्ज करण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मंडपांसाठी परवानगी देण्याची प्रक्रिया आता वेगाने होणार आहे.

गणेशोत्सवाला आता अवघा एक महिना शिल्लक असून मंडळांच्या मागे परवानगीचे विघ्न लागले आहे. पालिकेने या वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने परवानगी देण्याचे ठरवले होते, मात्र अनेक मंडळांचे पदाधिकारी ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येत होत्या. ऑनलाइन अर्ज भरण्यास मंडळांकडूनही फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे या वर्षी तरी ऑफलाइन पद्धतीने कार्यालयात अर्ज भरून घ्यावे अशी विनंती गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. ती आता प्रशासनाने मान्य केली आहे. ऑनलाइन कार्यपद्धती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या www.mcgm.gov.in या पोर्टलवरून मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

गणेशोत्सव मंडळांसाठी शिवसेनेची कायदेशीर मदत

न्यायालयाने गणेशोत्सवावर अनेक जाचक अटी लादल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याबरोबरच अन्य परवानग्या मिळवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यानुसार परवानगीकरिता अवश्यक कायदशीर सल्ला घेण्यासाठी गणेश मंडळांनी ९३२६५९६९७४ या क्रमांकावर (Helpline) शिवसेनेकडे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

परवानगी मिळणार ऑनलाइनच

मंडळांकडून मंडपाच्या परवानगीसाठीचे ऑफलाइन अर्जही स्वीकारण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मंडळांनी दिलेले ऑफलाइन अर्ज अधिकाऱ्यांनी ऑनलाइन भरायचे आहेत. त्यामुळे सगळे अर्ज हे ऑनलाइन भरले जाणार आहेत. त्यामुळे मंडळांनी अर्ज कसेही भरले तरी त्यांना परवानगी ऑनलाइन दिली जाणार आहे- विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त