
सामना प्रतिनिधी । नवी मुंबई
अत्यंत झपाटय़ाने विकसित झालेल्या आणि मुंबईला खेटून असलेल्या नवी मुंबईत स्वतःच्या मालकी हक्काच्या घराचे स्वप्न बघणाऱया सर्वसामान्य नागरिकांना आज सिडकोने गोड बातमी दिली. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटांसाठी (एलआयजी) १४ हजार ८३८ घरांची बंपर लॉटरी आज सिडकोने जाहीर केली. ही सर्व घरे तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी परिसरातील ११ गृहनिर्माण प्रकल्पांत असणार असून त्यांची किंमत १८ लाख ३१ हजार ते २५ लाख ४० हजार रुपयांच्या दरम्यान राहणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदाही या लॉटरीतील पात्र विजेत्यांना घेता येणार आहे, अशी घोषणा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आज येथे केली. म्हाडाप्रमाणेच या लॉटरीची प्रक्रिया १३ ऑगस्टपासून ऑनलाइन राबविण्यात येणार असून २ ऑक्टोबर अर्थात गांधीजयंतीला लॉटरी काढण्यात येईल.
– पाच हजार २६२ घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी तर नऊ हजार ५७६ घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांचे चटई क्षेत्रफळ ३१० चौरस फूट तर अल्प उत्पन्न गटासाठी घराचे चटई क्षेत्रफळ ३७० चौरस फूट असणार आहे. अनामत रक्कम ईडब्ल्यूएससाठी पाच हजार तर एलआयजीसाठी २५ हजार रुपये आहे.





























































