जिल्हा परिषद शाळांना घरघर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिलीप जाधव । खेड

जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थांनी पाठ फिरवल्याने तालुक्यातील तब्बल अनेक शाळांना कुलुप ठोकावे लागले आहे. विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत मात्र यामध्ये नियोजनाचा अभाव असल्याने पटसंख्या गळती थांबण्याऐवजी वाढतच चालली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षण हे तळागाळातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया मानला जातो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणारे प्राथमिक शिक्षणच त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ठरते. मात्र अलिकडे जिल्हा परिषदेच्या शाळांना घरघर लागलेली पहावयास मिळत आहे. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अगदी शेवटच्या घटकातील पालक ही आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांऐवजी खासगी शाळांमध्ये पाठवू लागला असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत.

पटसंख्येला लागलेली गळती रोखण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले गेले, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या. मोफत पाठय़पुस्तके, मोफत गणवेश, पोषण आहार यासारख्या योजनांवर लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला मात्र योजना राबविताना योग्य ते नियोजन न केले गेल्याने पटसंख्येला लागलेली गळती थांबण्याऐवजी वाढतच गेली. काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १ ली ते ७ वी पर्यंतच्या शाळांची पटसंख्या १०० किंवा त्या पेक्षाही जास्त होती. काही शाळांच्या इमारतीही विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कमी पडत असत. मात्र अलिकडे विद्यार्थ्यांची संख्या अगदीच नगन्य झाली आहे. सातवी पर्यंतच्या बहुतांशी शाळांची पटसंख्या ५० च्याही खाली आलेली आहे. १ ते चौथी पर्यंतची पटसंख्या १० पेक्षाही कमी आहे.खेड तालुका शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील सध्या २१ शाळांना पटसंख्येअभावी टाळं ठोकावं लागलं आहे. खरतरं हे शासनाच्या शिक्षण विभागाचे अपयश आहे.

शिक्षकांचा बराचसा वेळ ऑनलाईन काम करण्यात जात असल्याने विद्यार्थ्यांना शिकवताना अडचणी निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम शाळांचा गुणवत्तेवर आणि पर्यायाने शाळेच्या पटसंख्येवर होत आहे.

summary…zp school will go shut down