
सामना प्रतिनिधी। हिंगोली
जिल्ह्यामध्ये बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हिंगोली तालुक्यातील ईडोळी येथील शेतकरी श्रीराम जाधव यांनी बोंडअळीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे एक एकर शेतातील कापूस उपटून फेकल्याचा प्रकार घडला आहे.
हिंगोली तालुक्यातील ईडोळी येथील शेतकरी श्रीराम जाधव यांच्याकडे दहा एकर शेतं आहे. या वर्षी जाधव यांनी चार एकर क्षेत्रावर कापसाची लागवड केली. तर उर्वरित सहा एकर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे. जूनमध्ये पहिल्या पावसानंतर त्यांनी कापूस लागवड केली. हा कापूस चार ते सहा फूट उंचीचा झाला आहे. मात्र कापसावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शेंदरी बोंड अळीचा मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता या वर्षी पडलेल्या बोंडआळी मुळे पिकाचे नुकसान होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतातील एक एकर क्षेत्रावरील कापसावर बोंड आळी पडल्यामुळे त्यांनी आतापर्यंत किमान सात ते आठ वेळेस फवारण्या केल्या. मात्र त्यानंतरही अळीचे नियंत्रण झालेच नाही. त्याचा परिणाम इतर क्षेत्रावर होईल या भीतीने एक एकर क्षेत्रावरील कापूस जाधव यांनी उपटून फेकला. याबाबत कृषी विभागाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
summary…farmer throw out cotton in hingoli






























































