एलईडी दिव्यांनी सिन्नर लखलखणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिन्नर शहरातील सर्व पथदीप (स्ट्रीट लाइट) (सुमारे 4500 हजार पथदीप) बदली करून त्याठिकाणी एलईडी पथदीप लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून त्याकरिता ईईएसएल (एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड) कंपनीसमवेत करार करण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांत सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून डिसेंबर 2018 पर्यंत शहरातील सर्व लाइट बदलण्यात येणार आहे.

ईईएसएल ही एक केंद्र शासन संलग्न कंपनी असून कंपनीसोबत शहरातील सर्व पथदीपांवर एलईडी लाइट बसविण्याचा करार करणारी सिन्नर नगर परिषद ही नाशिक जिल्हय़ातील पहिली
नगर परिषद आहे. सर्व पथदीप बदलून एलईडी लाइट लावल्यामुळे नगर परिषदेच्या वीज बिलात सुमारे 40% बचत होणार असून पुढील सात वर्षांसाठी पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ईईएसएल कंपनीची असल्यामुळे नगर परिषदेस जुन्या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्ती कामी येणारा सुमारे 4.5 लाख रुपये प्रतिमाह खर्च वाचणार आहे.

7 ऑगस्ट रोजी सिन्नर नगर परिषदेत या करारासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरणजी डगळे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, गटनेते हेमंत (नाना) वाजे, उपनगराध्यक्ष शैलेशजी नाईक, नगरसेवक प्रमोद चोथवे, विजय जाधव, पंकज मोरे व विद्युत अभियंता कटयारे आणि ईईएसएलचे व्यवस्थापक मयंक कुमार हे उपस्थित होते.

ईईएसएल करारनाम्यामधील ठळक बाबी

1. सिन्नर शहरातील संपूर्ण पथदीप बदलून त्याजागी नवीन एलईडी लाइट बसविणे आणि पुढील सात वर्षांकरिता या एलईडी लाइटची देखभाल-दुरुस्ती करणे.
2. एलईडी लाइटस् चालू/बंद करण्याकरिता टाइमरची व्यवस्था करणे, जेणेकरून लाइटस् विहित वेळेत चालू/बंद होतील.
3. प्रत्येक मीटरला सीसीएमएस मशीन लावणे, जेणेकरून स्ट्रीट लाइट बंद पडल्यास याची तत्काळ माहिती यंत्रणेला मिळणार आहे.
4. नादुरुस्त असलेले स्ट्रीट लाइट 48 तासांच्या आत बदली करणे.
5. प्रत्येक स्ट्रीट लाइट पोलवर पोल नं. व टोल फ्री नं. टाकण्यात येणार आहे.
6. जुन्या साहित्याची विल्हेवाट करून नगर परिषदेस चांगला परतावा देण्याची जबाबदारी ईईएसएल कंपनीची राहील.

50 लाखांचे अनुदान

नगर परिषदेस येणाऱया वीजबिलात, पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्ती खर्च आणि नवीन वस्तू खरेदीमध्ये पुढील सात वर्षांसाठी कपात होणार असल्याने नगर परिषदेचे अंदाजे 4 कोटी रुपयांची बचत होणार आहे. तसेच सर्व लाइटस् बदलल्यानंतर पुढील दोन महिने वीज बिलात झालेली घट बघूनच ईईएसएल कंपनीस ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच योजना यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल राज्य शासनाकडून प्रोत्साहनपर 50 लक्ष अनुदान मिळणार आहे.