पंढरपूरमध्ये रंगणार पहिले फेसबूक स्नेह संमेलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

गेल्या दीड महिन्यांपासून चर्चेत असलेले पंढरपुरातील पहिले फेसबूक मित्र स्नेह संमेलन येत्या रविवारी १९ ऑगस्ट रोजी संपन्न होत असून या संमेलनावेळी राज्याचे सायबर विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. लालसिंग राजपूत, सोशल मीडियाचे व्यवसायीक प्रशिक्षक वैभव छाया, अश्‍विनी सातव – डोके, सॉप्टवेअर अभियंते गणेश अटकळे यांचे बहुमोल मार्गदर्शन यावेळी सहभागी फेसबूक मित्रांना होणार आहे.

पंढरपूर शहर आणि तालुक्यातील फेसबूकवर मित्र असलेल्या समविचारी युवकांनी एकत्र येऊन फेसबूक मित्र स्नेह संमेलन घेण्याची संकल्पना मांडली होती आणि अखेर ती अमलात येत आहे. या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने सोशल मीडियातील धोके, व्यवसायीक संधी, सुरक्षितता लक्षात घेऊन तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. राज्याच्या सायबर विभागाचे पोलीस अधिक्षक लालसिंग राजपूत यांचे सायबर क्राईम यासंदर्भात व्याख्यान होणार आहे. यावेळी सायबर गुन्हेगारी, त्यासंदर्भातील सध्या प्रचलीत असलेले कायदे, नवीन कायदे आणि गुन्ह्यांची व्याप्ती यासंदर्भात मार्गदर्शन लाभणार आहे. तर सोशल मीडियाची व्याप्ती आणि वाढती गरज लक्षात घेऊन विविध प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायीक संधी कशा उपलब्ध आहेत यासंदर्भात मुंबई येथील निवडणूक प्रचार तज्ञ, प्रभावी वक्ते, सोशल मिडीयाचे अभ्यासक लेखक वैभव छाया यांचेही यावर मार्गदर्शन असणार आहे. सोशल मीडियासंदर्भात महिला, युवतींनी घ्यावयाची काळजी, त्यांची सोशल मिडीयातील सुरक्षितता यासंदर्भात पत्रकार अश्‍विनी सातव – डोके या मार्गदर्शन करणार आहेत. या बरोबरच सहभागी फेसबूक मित्रांना आपले व्यक्तीगत गुणदर्शन कविता, कथा- कथन, वादन, गायन असे अनेक मनोरंजनपर कार्यक्रमाचेही नियोजन करण्यात आले आहे.