
सामना प्रतिनिधी । मुंबई
वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवण्यापासून सीसीटीव्ही कॅमेरे, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर निर्बंध व ओव्हरटेकला आळा घालणारी इंटिग्रेडेट ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) यंत्रणा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर बसवण्यात येणार आहे. पण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे. त्यामुळे आयटीएमएस यंत्रणा समृद्धी महामार्गापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बसवा. बेफाम वेग व अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील रस्ते सुरक्षा व्यवस्थेत सर्वप्रथम सुधारणा करा असे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दिले.
सीएम विमानाने येतील!
आठ तासांत नागपूरवरून मुंबई गाठता येईल पण मुख्यमंत्री या रस्त्यावरून येणार नाहीत. ते विमानाने येतील. बुलेट ट्रेन झाली तर त्याने येतील. त्यामुळे समृद्धी महामार्गावर एवढा वेग ठेवण्याची गरज नाही अशी सूचना रावते यांनी केली.
रस्त्यांवरील अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ते सुरक्षा परिषद सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली होती. परिवहन मंत्री दिवाकर रावते परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. परिवहन विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. रस्त्यांवरील अपघातांना आळा घालण्यासाठी योजण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती या बैठकीत देण्यात आली. त्यावेळी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने राबवण्यात येणाऱ्या आधुनिक यंत्रणेची माहितीही देण्यात आली.
समृद्धी महामार्गावर ताशी 150 किमी वेगाने वाहने धावू शकतील अशा पद्धतीने रस्ते बांधणी सुरू आहे. नागपूरहून मुंबई आठ तासांत गाठता येईल. त्यामुळे रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी या महामार्गावर आयटीएमएस ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेताना ट्रक आढळून आल्यास पकडणारी यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रस्ते विकास महामंडळातर्फे देण्यात आली.


























































