कचऱयाच्या डब्यांनाही ‘आरएफआयडी’ कार्ड,कचरा उचलला की नाही ते कळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

कचरा वर्गीकरणाला चालना मिळावी याकरिता यापुढे कचऱयाच्या गाडय़ांमध्ये अर्थात कॉम्पॅक्टरमध्ये ओल्या व सुक्या कचऱयासाठी वेगवेगळे कप्पे ठेवण्यात येणार आहेत. तसेच त्यात  ई कचऱयासाठीही वेगळा कप्पा  ठेवण्यात येणार आहे. घनकचरा वाहून नेण्यासाठी पालिकेने अत्याधुनिक स्वरूपाचा ‘साइड लोडिंग कॉम्पॅक्टर’ भाडय़ाने घेण्याचे ठरवले आहे. येत्या सात-आठ महिन्यांत संपूर्ण मुंबईत या गाडय़ांतून कचऱयाची वाहतूक होणार आहे.

शहरातील प्रत्येक इमारतीत गोळा केलेला घनकचरा डंपिंग ग्राऊंडपर्यंत वाहून नेण्यासाठी ‘साइड लोडिंग कॉम्पॅक्टर’सह 645 कॉम्पॅक्टर्सची सेवा भाडय़ाने घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये 399 मोठे कॉम्पॅक्टर्स व 246 लहान कॉम्पॅक्टर्सचा समावेश आहे. या सर्व कॉम्पॅक्टर्समध्ये ‘जीपीएस’, ‘आरएफआयडी रीडर’ या अत्याधुनिक सुविधांसह ओला कचरा, सुका कचरा व ई-कचरा यांच्यासाठी स्वतंत्र कप्पा असल्याने कचरा एकमेकात मिसळणार नाही याची दक्षता आपोआपच घेतली जाणार आहे. हे कॉम्पॅक्टर्स सर्व 24 विभागांत टप्प्याटप्प्याने वापरात येणार असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. या कॉम्पॅक्टर्सच्या सेवा निविदा आधारित कंत्राटी पद्धतीने भाडय़ाने घेण्यास सुरुवात करण्यात येत आहे. यामध्ये मोठय़ा कॉम्पॅक्टर्सची कचरा वाहून नेण्याची क्षमता सहा टन इतकी असून लहान कॉम्पॅक्टर्समधून अडीच टन कचरा वाहून नेता येऊ शकतो.

देशात प्रथमच वापरात येणार ‘साइड लोडिंग कॉम्पॅक्टर’

‘साइड लोडिंग कॉम्पॅक्टर’मध्ये गाडीच्या डाव्या बाजूने कचऱयाचा डबा उचलण्याची सुविधा आहे. या गाडय़ा वाहतुकीच्या दृष्टीने अधिक सुविधाजनक असणार आहेत. ‘साइड लोडिंग’ पद्धतीचे कॉम्पॅक्टर्स हे देशात प्रथमच वापरात येणार असून प्रत्येक विभागात दोन ते चार कॉम्पॅक्टर्स हे ‘साइड लोडिंग’ पद्धतीचे असणार आहेत. यामुळे कचरा गाडीवर काम करणाऱयांना कचऱयाच्या डब्याला हात लावण्याची आवश्यकता भासणार नाही.

सुरुवात मालाड-कांदिवलीमधून

या अत्याधुनिक कॉम्पॅक्टर्सच्या वापराची सुरुवात ‘पी-उत्तर’ व  ‘पी-दक्षिण’ या दोन प्रशासकीय विभागांच्या कार्यक्षेत्रात येत्या 21 ऑगस्टपासून होणार आहे. यानुसार या दोन्ही विभागांत 48 मोठे, तर 14 लहान कॉम्पॅक्टर्स वापरात येणार आहेत, तर उर्वरित 22 विभागांत 6 ते 8 महिन्यांत हे अत्याधुनिक कॉम्पॅक्टर्स येणार आहेत.

प्रत्येक कचऱयाच्या डब्याला ‘आरएफआयडी टॅग’

या अत्याधुनिक कॉम्पॅक्टरमध्ये ‘आरएफआयडी रीडर’ असेल तसेच प्रत्येक डब्याला ‘आरएफआयडी टॅग’ बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक डबा कधी उचलला गेला याची माहिती मिळणे शक्य होणार आहे. डबा उचलला न गेल्यास त्यासाठी दंड आकारण्यात येणार आहे. प्रत्येक कॉम्पॅक्टर भरलेला असताना व रिकामा झाल्यावर वजन होणार असून त्याची माहिती ‘रियल टाइम बेसिस’वर ‘ऑनलाइन’ उपलब्ध होणार आहे. कंत्राटदारास करण्यात येणारे अधिदान हे ‘ऑनलाइन जीपीएस’ व ‘आरएफआयडी’ प्रणालीमार्फत निर्माण होणाऱया अहवालानुसार होणार आहेत.