
सामना ऑनलाईन । इगतपुरी
निसर्ग संपदा भरभरून लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली परिसर इंद्रपुरी म्हणून विकसित होणार आहे. सामूहिक प्रयत्नांनी भावली भागाचा कायापालट करण्यात येणार असून या ठिकाणी हॉलिडे व्हिलेज प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामुळे इगतपुरीच्या पर्यटनाला चालना मिळणार असून याचा शुभारंभ भावली धरण भागात पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शेकडो उपयुक्त वृक्षांची लागवड करून करण्यात आला.
भावली भागात उपयुक्त वृक्ष लावून इगतपुरी सिटिझन्स फोरमच्या युवकांकडून संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. या निसर्गरम्य भागात हजारो पर्यटकांची गर्दी होते. म्हणून मोठय़ा प्रमाणावर वड, पिंपळ, जांभूळ, आंबा, सोनचाफा, रेन ट्री, बदाम, काजू आदी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे आशुतोष राठोड, समृद्धी महामार्ग उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे, जलसंपदा कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, प्रमोद कुलकर्णी, महिंद्रा इगतपुरीचे विजय कालरा, विजय नायर, हिरामण आहेर, नासिर देशमुख, प्रदीप देशमुख, जयंत इंगळे, इगतपुरी सिटिझन्स फोरमचे फोरमचे अमित रोहमारे, संजय खातळे, प्रशांत कडू, ऋतुराज थोरात, जगन कदम, विनायक पाटील, रवींद्र परदेशी, मंगेश शिरोळे, पंकज रहाणे, नीलेश पाटील, विनोद साळुंके, सचिन परदेशी आदी उपस्थित होते.
इगतपुरी महिंद्रा कंपनी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, इगतपुरी सिटिझन्स फोरम यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या सहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इगतपुरी भागातील निसर्गसंपदा टिकवून परिसराचा योग्य प्रकारे विकास, पर्यटकांसाठी सुविधा, पार्ंकगची व्यवस्था, खाद्यपदार्थ व विविध वस्तूंचे सरकारमान्य अधिकृत स्टॉल, कचऱयाचे सुयोग्य व्यवस्थापन, इगतपरी रेल्वे स्थानकावरून पर्यटन स्थळापर्यंत जाण्यासाठी माफक दरात वाहतूक व्यवस्था, मद्यपी हुल्लडबाजांपासून मुक्तता यासाठी फोरमचे पदाधिकारी व कार्यकर्ते सतत पाठपुरावा करतात.
इगतपुरीच्या वैभवात भर पडणार
इगतपुरी तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा भावली धरण परिसर, निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरून दिलेली वनराई, मंद धुंद करणारा पाऊस, क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण, घनदाट वृक्षांची छाया, मुक्तहस्ते निर्मित धबधबे अशा अनेकानेक अंगांनी नटून थटून स्वागत करणारा भावली धरण परिसर, या भागात इतक्या मोठय़ा प्रमाणात इगतपुरी सिटिझन्स फोरमने उपयुक्त झाडांची लागवड केल्याने भावली परिसर खऱया अर्थाने इंद्रपुरी म्हणून नावारूपाला येणार आहे. हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने इगतपुरीच्या वैभवात भर पडणार आहे.

























































