
सामना ऑनलाईन, उज्जैन
मध्य प्रदेशातील एका न्यायालयाने बलात्काराच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी निकाल सुनावला आहे.अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला विशेष न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोमवारी या प्रकरणातील आरोपपत्र दाखल झालं होतं. न्यायालयाने सोमवारीच या प्रकरणाचा निवाडा करीत आरोपीला शिक्षा सुनावली. बलात्कार प्रकरणी देण्यात आलेला हा देशातील बहुधा सगळ्यात जलद निकाल मानला जातोय.
15ऑगस्टला चिमुरडीचे पालक तिला शेजारी राहणाऱ्या 14 वर्षांच्या मुलाच्या स्वाधीन करून बाहेर गेले होते. याचा फायदा उचलत या मुलाने मुलीवर बलात्कार केला होता. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करीत सोमवारी या प्रकरणातील आरोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं. न्यायाधीश तृप्ती पांडे यांनी आरोपपत्र दाखल झाल्याच्या अवघ्या काही तासात साक्षीपुरावे तपासत आदेश दिला. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला 2 वर्षांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
इतर जलद निकाल
- 8 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील दतिया न्यायालयाने बलात्काऱ्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. संपूर्ण खटला चालवून हा आदेश न्यायालयाने अवघ्या 3 दिवसात दिला होता.
- छतरपूर जिल्ह्यातील एका न्यायालयाने बलात्काऱ्याला 27 दिवसात शिक्षा सुनावली होती. अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार करणाऱ्या तौहीद खान याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे.
- 8 जुलै रोजी मध्य प्रदेशातील सागर इथे झालेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयाने सुनावणी 46 दिवसांत पूर्ण केली होती. 21 मे रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल भग्गी नावाच्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
- या वर्षी राजस्थानातील अलवर जिल्ह्यात न्यायालयाने 7 महिन्य़ाच्या मुलीचं अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती.


























































