कुडाळात गुरूपौर्णिमा उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

श्री देव नगर ब्राम्हण मारूती मंदीर बाजारपेठ-कुडाळ येथे विशाल राणे भजनी बुवांच्या शिष्यांच्यावतीने रविवारी गुरूपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश पुजन करून बाजारपेठेतील प्रतिष्ठीत व्यापारी राजन शिरसाट यांनी केले व दिपप्रज्वलन नगर ब्राम्हण मारूती मंदिराचे अध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी भजनी बुवा विशाल राणे, राजेश म्हाडेश्वर, सुमेध साळवी, संदेश पडते, दिपक भोगटे, स्वरूप सावंत, बाबी बांदेकर व इतर मान्यवर होते.

विशाल राणे बुवांचे शिष्य वैभव सावंत यांनी गणेशस्तवन सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरूवात केली. त्यानंतर महीलाभजनी बुवा शिष्यांनी भजनसेवा सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच पखवाजवादक शिष्यांनी पखवाज वादन करून प्रेक्षकांची शाबासकी मिळवली. तसेच छोटे बालकलाकारांनी हार्मोनिअम, पखवाज वादन करून गुरूंची सेवा केली. त्याचप्रमाणे बुवा सातार्डेकर, विलास बाक्रे, तुळशिदास कोरगावकर, मयुर पिंगुळकर या प्रसिध्द बुवांनी भजन सेवा सादर करून शिष्यांना मार्गदर्श्‍न केले. तसेच बुवा विशाल राणे यांनी हार्मोनिअम, सोलोवादन केले त्यांना त्यांचेच शिष्य पखवाजवादक निखिल पावसकर, तबलासाथ साईप्रसाद नाईक यांनी करून कार्यक्रमामध्ये रंगत आणली.

या कार्यक्रमास अरविंद शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, प्रकाश वर्दम, नंदु म्हाडेश्‍वर, दिनार शिरसाट, बाव सरपंच नागेश परब, विलास कोरगावकर यांनी भेट देऊन विशाल राणे बुवांचे कौतुक केले. या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले व संपुर्ण गुरूपौर्णिमा कार्यक्रमाचे निवेदन देवंद्र गावडे यांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. या गुरूपौर्णिमा उत्सवामध्ये विशाल राणे बुवांचे 300 शिष्य सहभागी झाले होते. शेवटच्या सत्रामध्ये सर्व शिष्यांनी भैरवी सादर करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.