
सामना ऑनलाईन, अहमदाबाद
विदेशात राहणाऱ्या एक हिंदुस्थानी वंशाचा माणूस भयंकर अडचणीत सापडला आहे. घटस्फोट घेतलेल्या बायकोसोबत एक रात्र घालवल्यानंतर या बायकोने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावत पोलिसांत तक्रार केली आहे. घटस्फोट झाल्यानंतरही हे दोघेजण जवळपास १ वर्ष एकत्र राहत होते. नवरा हा कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून बायको ही बडोद्यामध्ये राहते. बायकोने नवऱ्याविरूद्ध केलेल्या तक्रारीत म्हटलंय की पुन्हा लग्न करण्याचं आश्वासन देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
नवऱ्याने मात्र हे आरोप खोटे असल्याचं म्हटलंय मी दुसरं लग्न करणार असल्याचं कळाल्याने माझ्यावर हे आरोप लावण्यात येत असल्याचं नवऱ्याचं म्हणणं आहे. पोलिसांत तक्रार झाल्यानंतर घाबरलेल्या नवऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने नवऱ्याला दिलासा देत प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत त्याला अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. २०१५ साली या दोघांनी सासू-सुनेच्या भांडणामुळे घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतरही हे दोघेजण अमेरिकेत राहत होते. या नवऱ्याने पुन्हा लग्न करू, मी घटस्फोट फक्त आईच्या समाधानासाठी दिला होता असं आश्वासन दिल्याचं विभक्त महिलेचं म्हणणं आहे. या दोघांपैकी खरं कोण बोलतंय आणि खोटं काय सांगतोय हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

























































