सीएसएमटीत रेल्वेच्या बोगीत रेस्टॉरंटची योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मागील पी. डिमेलो प्रवेशद्वाराशेजारी आता रेल्वेच्या बोगीतच रेस्टॉरंट थाटण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या विभागात हेरीटेज गॅलरीपाठोपाठ आता रेल्वेचे हे अनोखे थिम रेस्टॉरंट उभारण्यासाठी आयआरसीटीसीची मदत घेण्यात येणार आहे. एखाद्या जुन्या बोगीचे रूपांतर रेल्वे थिमवर आधारित रेस्टॉरंट तयार करण्यासाठी करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने झोनल रेल्वेला दिले आहेत. या रेस्टॉरंटला चांगले स्वरूप देण्यासाठी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तज्ञ्जांची मदत घेण्यात यावी असेही रेल्वे बोर्डाने म्हटले आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी हे अशा प्रकारच्या संकल्पना राबवीत असतात. मध्य प्रदेशच्या पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी रेल्वे थिमवर आधारित रेस्टॉरंट तयार करण्याची संकल्पना मांडली होती. ‘शान-ए -भोपाळ एक्स्प्रेस’ हे रेस्टॉरंट त्यांनी प्रवासी व इतरांसाठी 2007 मध्ये हॉटेल लेक व्यूह अशोक येथे उभारले होते.