कन्हैया कुमारचा मोदी सरकारवर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

निवडणुकांपूर्वी देशात जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण निर्माण केले जात असून सत्ताधाऱयांच्या भूमिकांना विरोध करणाऱयांना घाबरवले जात आहे असा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने आज नरेंद्र मोदी सरकारवर केला. मोदी सरकारकडून मुख्य प्रश्नांचीच उत्तरे मिळत नाहीत. मग पेट्रोल महाग झाले म्हणून ‘औरंगजेब’ला दोषी कसे धरणार अशी खिल्लीही त्याने उडवली.

मुंबईत प्रेस क्लबमध्ये आयोजित वार्तालापामध्ये कन्हैया कुमार याने मोदी सरकारवर निशाणा साधला. भीतीचे वातावरण निर्माण केल्याशिवाय त्यांना निवडणुका जिंकता येणार नाहीत असे तो म्हणाला. समाजात सध्या ‘फोडा आणि राज्य करा’ असा एककलमी कार्यक्रम सुरू असून त्याविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे असे तो म्हणाला. या सरकारकडून घटनेच्या जागी मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न होत आहे अशीही टीका त्याने केली.

गौरी लंकेश यांचा खून करणारे आणि आम्हाला विरोध करणारे एकच आहेत असा गंभीर आरोपही कन्हैयाने यावेळी केला. तुरुंगातून सुटल्यावर चेंबूर येथे झालेल्या आपल्या सभेला काही लोकांनी विरोध केला आणि त्याच लोकांनी नंतर लंकेश यांची हत्या केली असा दावा त्याने केला. लंकेश यांच्या मारेकऱ्यांना कर्नाटक पोलीस पकडणार अशी कुणकुण लागल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी घाईघाईने आरोपींना अटक केली. पाच वर्षांनंतर पोलिसांना या आरोपींना अचानक अटक करण्याची गरज का वाटली याचा शोध घ्यायला हवा असे तो म्हणाला.