
सामना प्रतिनिधी , मुंबई
शहर भागात मेट्रोची कामे विविध ठिकाणी सुरू असून ही कामे करण्यासाठी मेट्रो प्राधिकरणाने बेस्ट उपक्रमाची वीज घेतली आहे. मात्र प्रत्यक्ष मेट्रो सुरू झाल्यावर ट्रेन चालवण्यासाठी मात्र वीजपुरवठा करण्यासाठी टाटा कंपनीला कंत्राट दिले आहे. मेट्रोने सोयीचे राजकारण केल्याचा आरोप बेस्ट समितीमध्ये सदस्यांनी केला आहे.
बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागासाठी केबल खरेदी करण्याचा प्रस्ताव आजच्या बेस्ट समितीसमोर आला होता. त्यावेळी मेट्रोला वीजपुरवठा कोण करणार आहे, असा सवाल सुनील गणाचार्य यांनी केला होता. त्यावर महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी मेट्रोचे काम सुरू असलेल्या साईटवर बेस्टची वीज असून प्रत्यक्ष ट्रेन चालवण्यासाठी विजेचे कंत्राट टाटाला देण्यात आल्याची माहिती दिली. बेस्टने मेट्रोला नेहमीच सहकार्य केले मात्र वीज घेताना मेट्रोला बेस्टची आठवण झाली नाही का, असा सवाल यावेळी सदस्यांनी केला. मुंबई शहरात बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाकडून वीजपुरवठा केला जातो. बेस्ट विद्युत विभागाकडे 10 लाख वीज ग्राहक आहेत. सुरळीत व अखंड वीजपुरवठा करते म्हणून बेस्टला वीज ग्राहक पसंती देतात. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर टाटा पावर शहरात वीजपुरवठा करण्यास आली आहे. आता तर मेट्रोला टाटा पावर वीजपुरवठा करणार असल्याने बेस्टला महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.
मेट्रोला पायघड्या कशाला?
मेट्रोच्या कामांसाठी बेस्टने आतापर्यंत नेहमीच सहकार्य केले. मेट्रो प्राधिकरणाने सांगितल्यावर बेस्टचे बस स्टॉपही हटवले. पण ट्रेन चालवण्यासाठी मेट्रोने बेस्टला का कंत्राट दिले नाही, असा सवाल यावेळी अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी महाव्यवस्थापकांना केला. बेस्टचीच वीज अधिकाधिक ग्राहकांनी आणि आस्थापनांनी घ्यावी म्हणून नेमलेल्या पथकातील अधिकारी काय करतात, असाही सवाल अध्यक्षांनी यावेळी केला.




























































