पोस्टल बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी राज्यशिष्टाचाराचा भंग, राजीव सातव यांची तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, हिंगोली

देशभरामध्ये पोस्टल बँक सेवेची सुरुवात झाली असून हिंगोली शहरातही या पोस्टल बँकेच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमामध्ये राज्यशिष्टाचाराचा बिनधास्तपणे भंग करण्यात आला. पोस्ट बँकेच्या उद्घाटनाला काँग्रेसचे खासदार राजीव सातव, शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शिवरानी नरवाडे यांच्यासह विधानपरिषद आमदारांना डावलण्यात आले आहे. राजशिष्टाचाराचा भंग करत श्रेय लाटण्यासाठी भाजपकडून झालेल्या या प्रकारामुळे पोस्टाचे बडे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता असून अधिकाऱ्यांविरुद्ध लोकसभा अध्यक्षांकडे हक्कभंग दाखल केला जाणार असल्याचे खासदार राजीव सातव यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी संभाजीनगर क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल कार्यालयाकडून यासाठी पत्रके छापण्यात आली होती. पोस्ट विभाग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असताना देखील खासदारांना या कार्यक्रमाच्या पत्रिकेतून डावलण्यात आले. यासोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे, शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शिवरानी प्रकाश नरवाडे, हिंगोलीचे विधानपरिषद सदस्य विप्लव बाजोरिया , आमदार रामराव वडकुते यांचे नाव कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत नव्हते. असं करून पोस्ट विभागाने राजशिष्टाचाराचा भंग केला असल्याचं राजीव सातव यांचं म्हणणं आहे.