
सामना प्रतिनिधी । कुडाळ
गोविंदा आला रे आला…मच गया शोर सार नगरी रे…तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा…गोविंदा रे गोपाळा अशा एकापेक्षा एक गाण्यांवर थिरकत आणि डिजेच्या तालावर नाचत तसेच रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सोमवारी कुडाळात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहरात शिवसेना, महाराष्ट्र स्वाभिमान व हेल्प ग्रुपने दहीहंडी बांधली होती. यावेळी नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी केली होती.
कुडाळात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवसेना पुरस्कृत दहीहंडी शाखेसमोरील रस्त्यावर बांधण्यात आली. या दहीहंडीचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत गाव गाता गजाली फेम दिपाली जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. नेरूरच्या महिला ढोलपथकाने ढोलवादन करून लक्ष वेधले. त्यानंतर वेतोरेच्या गोविंदा पथकाने सलामी दिली. हेल्प ग्रुपच्या वतीने नक्षत्र टॉवर जवळ मुख्य रस्त्यावर दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे यंदाचे चौदावे वर्ष होते. या दहीहंडीचे उद्घाटन विवेक पंडीत यांच्या हस्ते करण्यात आले. वालावल येथील महिला ढोलपथकाने आपली कला सादर केली. येथे गणेशवंदना कार्यक्रमासह बॉडीशो, महिला ढोलपथकाचे सादरीकरण व चिमणी पाखर डान्स अॅकॅडमीचा नृत्य नजराणा सादर झाला.
पोस्ट ऑफीस जवळ महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, कुडाळ कार्यालयाजवळ यावर्षी स्वाभिमान कुडाळ शहराच्या वतीने दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील दहीहंड्या फोडण्यासाठी जिल्हाभरातून गोविंदा पथके दाखल झाली होती. सायंकाळी उशिरा पर्यंत दहीहंडीचा उत्साह सुरू होता. रसिकांनी दहिहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





























































