एनडीएच्या काळातील किती कर्जे एनपीए झाली तेही जाहीर करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसच्या काळात फोन पे लोन,  पद्धतीने नामदारांच्या फोनवरून व्यापारी, व्यावसायिकांना बँकांनी जी कर्ज वाटली  त्यातील बऱ्याचशा कर्जाची एनपीएत रूपांतर करावे लागले, असे मोदी म्हणातात. मग यूपीए काळातील कर्जांसह  एनडीएच्याही काळातील  किती कर्ज एनपीए झाले तेही जाहीर करा, असे आव्हान माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

बँकांकडील थकीत कर्जांना काँग्रेस जबाबदार आहे, अशी टीका मोदींनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे उद्घाटन करताना केली. 2014 पूर्वी 12 उद्योजकांना पावणेदोन लाख कोटींची कर्जे दिली. त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केल्याचे मोदी यांनी सांगितले.

काँग्रेसप्रणित यूपीएच्या काळात दिलेल्या थकीत कर्जाचे रुपांतर एनपीएमध्ये झालेले आहे, हे मोदी यांचे म्हणणे आहे. पण या कर्जांपैकी काँग्रेसच्या काळात किती कर्जे आणि एनडीएच्या काळात  किती कर्जे पुनर्रचित केली, याचा तपशील द्या असेही चिदंबरम यांनी मोदी यांना सुनावले.