महिन्याभरानंतर मत्स्य विभागाची गस्ती नौका समुद्रात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । मालवण

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्ससीन नौकांची घुसखोरी सुरु आहे. १ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यात काही परप्रांतीय व काही अनधिकृत नौका अगदी किनाऱ्यालगत पारंपरिक मच्छिमारांच्या राखीव क्षेत्रात थेट दहा वाव समुद्रात येऊन मासळीची लूट करत आहेत. याबाबत मत्स्य विभागाकडून काहीच कार्यवाही केली जात नसल्याने पारंपरिक मच्छीमार संतप्त बनले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार मत्स्य विभागाकडून गतवर्षीच्या करारातील गस्ती नौका तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, परप्रांतीयांच्या शेकडो नौकांना सागरी जलधि क्षेत्रात मासेमारी करण्यापासून रोखण्याची पूर्ण मदार या गस्ती नौकेवर असणार आहे. मत्स्य विभागाकडून सोमवारपासून गस्तीनौका समुद्रात उतरविण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य आयुक्त राजकुमार महाडिक यांनी दिली. त्यामुळे पर्ससीन व हायस्पीड नौकांवर कारवाई होणे मच्छीमारांना आताच्या घडीला अपेक्षित आहे.

कोकण किनारपट्टीवर १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत पर्ससीन मासेमारी करता येते. त्यामुळे १ तारीख पासून पर्ससीन व हायस्पीड नौका धारकांचा मत्स्य हंगाम सुरु झाल्याने त्यांनी शेकडो नौकानी आपला मोर्चा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वळविला आहे.

मच्छीमारांच्या हातातोंडाशी आलेल्या मासळीच्या घासावर डल्ला मारून मासळीची लूट मोठ्या प्रमाणात केली जात आहे. गेले तीन दिवस परप्रांतीय पर्ससीन व हायस्पीड नौकानी मालवण किनारपट्टीवर धुडगूस घातल्याने मच्छीमार आक्रमक बनला आहे. मत्स्य विभागाकडून कारवाई करण्यासंदर्भात पावले उचली गेली नाहीत तर संघर्षाची ठिणगी कोणत्याही क्षणी पडू शकेल, अशी स्थिती किनारपट्टीवर निर्माण झाली आहे.

आमदार नाईक यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष
मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांची मच्छीमार बांधवानी भेट घेत लक्ष वेधले. त्यानुसार आमदार नाईक यांनी मत्स्य आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधत तात्काळ गस्ती नौका सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे सोमवारी सकाळी मागील वर्षीच्या करारातील गस्तीनौका मत्स्य विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली. अनियंत्रित मासेमारीला लगाम घालण्याच्या उद्देशाने समुद्रात उतरवण्यात आलेल्या या गस्तीनौकेकडून मच्छीमाराना मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत.

रात्रौची घुसखोरी…
पर्ससीन नौकांकडून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर घुसखोरी करून मासळीची लूट केली जाते. त्यामुळे शेकडो परप्रांतीय नौकांकडून सुरु असलेली घुसखोरी रोखणे मत्स्य विभागाला आव्हान असणार आहे. मात्र आमदार नाईक यांच्या सूचनेनुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या गस्तीनौकेकडून पर्ससीन नौकांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी मच्छीमार करत आहेत.