
सामना प्रतिनिधी । जामगाव
पारनेर तालुक्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा बहुमान जामगाव गावाने पटकावला असून यापुढे सर्व नोंदी व दाखले ग्रामस्थांना ऑनलाईन मिळणार असल्याने ग्रामपंचायत कारभार आणखी पारदर्शक व स्वच्छ होणार आहे. ग्रामस्थांना जलद व गतिमान सेवा मिळणार असल्याने लोकांचे वेळ व श्रम वाचणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांनी दिली.
ग्रामपंचायत पेपरलेस झाल्याची तपासणी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रशांत शिर्के यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा परिषद नगरचे आपले सरकार सेवा केंद्र समन्वयक आव्हाड सर, आपले सरकार सेवा केंद्र हार्डवेअर इंजिनियर पठारे सर, चितळकर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत संगणक परिचालक प्रवीण मुंजाळ यांनी ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे यांचे मार्गदर्शना खाली व लिपीक सुदर्शन खामकर यांचे सहकार्याने सर्व दप्तर ऑनलाईन केलेले आहे.
तालुक्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत झाल्याने जामगावकरांच्या शिरपेचात स्मार्ट ग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान बरोबरच आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांबद्दल पंचायत समिती सदस्या सुनंदाताई धुरपते, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, गट विकास अधिकारी तनपुरे, सभापती राहुल झावरे पाटील, उपसभापती दिपक पवार, दिनेश बाबर, सुप्रिया झावरे पाटील, विस्तार अधिकारी अभंग,महादेव भोसले यासह सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.































































