281 मंडपांच्या परवानग्या ‘तांत्रिक कचाटय़ात’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

गणेशोत्सव अवघ्या आठवडय़ावर आला असताना विविध तांत्रिक कारणांमुळे पालिकेने तब्बल 281 मंडळांना मंडपासाठी परवानगी नाकारली आहे. यातच मंडप परवानगीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपल्यामुळे या गणेशोत्सव मंडळांसमोर परवानगीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे नाकारलेल्या परवानग्यांबाबत पालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

गणेशोत्सवासाठी पालिकेकडे या वर्षी 3499 इतके विक्रमी अर्ज आले. मात्र पालिकेने या वर्षीपासूनच सुरू केलेल्या ऑनलाइन परवानगीच्या घोळामुळेच अनेक मंडळांना अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्याचा आरोप गणेशोत्सव समितीने केला आहे. दरम्यान, विविध कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्यामुळे 281 मंडळांना मंडप परवानगी नाकारली असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. यामध्ये दोन वेळा अर्ज केल्याने 759 अर्ज नाकारण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 2740 मंडळांना मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे, तर 296 परवानग्या देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये 79 टक्के परवानग्या देण्याचे काम पूर्ण झाले असून फक्त 11 टक्के परवानग्या देण्याचे काम सुरू असून 10 टक्के मंडळांना परवानग्या नाकारण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापौर, पालिका प्रशासनाकडे बैठक

281 मंडळांना परवानगी नेमकी कोणत्या कारणामुळे नाकारण्यात आली आहे याची माहिती पालिका प्रशासनाकडून घेतली जाईल, असे गणेशोत्सव समितीचे सेक्रेटरी विनोद घोसाळकर यांनी सांगितले. याबाबत महापौर, पालिका प्रशासनाचे संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असेही ते म्हणाले. अर्जातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी बैठकीत विचारविनिमय करण्यात येईल, असेही घोसाळकर यांनी सांगितले.

मुंबई-महाराष्ट्रासह अवघ्या देशात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात मंडप परवानगीची कोणतीही अडचण येऊ देऊ नका असे निर्देश पालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी गणेशोत्सवात मंडळांना परवानगीचे कोणतेही संकट येणार नाही-प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, महापौर