बीड जिल्ह्यात दुष्काळाचे दशावतार; शेतकरी संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

सप्टेंबर महिना संपायला आला तरी आतापर्यंत बीड जिल्ह्यात सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे ओढे, नाले ,नद्या अजूनही कोरड्याच असून कापूस ,तूर सोयाबीन आणि बाजरीचे पीक हाती येईल का अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ,कधी लाळ्या रोगाचा फेरा तर कधी बोंडअळीचा प्रादुर्भाव अशा संकटांनी शेतकरी चिंताग्रस्त आहेत. हाती कोणतेच पीक लागत नसल्याने नैराश्याने शेतकरी आत्महत्या करण्याची भीती वाढत आहे. बीड जिल्ह्यात गावागावात अशीच परिस्थिती आहे.

बीड अवर्षणग्रस्त जिल्हा असून उद्योग-धंदे नाहीत. या जिल्ह्याची सर्व मदार शेतीवरच आहे. मात्र,लहरी वातावरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षीच्या संकटावर मात करत शेतकऱ्यांनी कर्ज, उसनवारी करून पैसा शेतीत गुंतवला. यंदा पीक हाती लागेल या आशेने मेहनत केली. मात्र, लहरी निसर्गाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले. चार वर्षाच्या भीषण दुष्काळातून शेतकरी सावरत असताना बोंडअळीने हाती आलेले पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
शेतकऱ्यांचे चार महिने पावसाच्या प्रतिक्षेतच गेले. कापूस हातचा गेला. पावसाअभावी तुरीची वाढ खुंटली, सोयाबीन उद्ध्वस्त झाले. उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला. निदान बाजरीचे पीक तरी हाती पडेल काय अशा चिंतेत शेतकरी आहेत.