
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
संगमेश्वर देवरुख या राज्यमार्गावर दिवसेंदिवस वाहतूक कमालीची वाढत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे या मार्गाकडे होणारे दुर्लक्ष वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. या मार्गाच्या दुतर्फा वाढलेली झुडपे गेल्या दोन वर्षात न तोडल्याने पदपथ नावाचा प्रकारच शिल्लक राहीलेला नाही. परिणामी सध्या पादचाऱ्यांना डांबरी रस्त्यावरुन चालावे लागत असून ते अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साधी झुडपे तोडली जात नसल्याने लोवले येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव करुन रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली ही झुडपे त्वरीत तोडण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे. याबरोबरच शिवसेना संगमेश्वर शहरप्रमुख संजय कदम यांनी आठवडाभर झुडपे न तोडल्यास जन आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
दरवर्षी गणेशोत्सवा पूर्वी संगमेश्वर देवरुख मार्गाच्या दुतर्फा पावसाळ्यात वाढणारी झुडपे बांधकाम विभागाकडून तोडण्यात येत असत. मात्र गेली दोन वर्षे ही झुडपे न तोडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवघड वळणार झुडपांमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात घडत असून यामुळे वाहनांचे नुकसान तर होतेच शिवाय वादविवाद आणि त्यातून हाणामाऱ्या आणि वाहनचालक , पादचारी जखमी होण्याचे प्रकार सतत घडत आहेत. एवढे प्रकार घडूनही बांधकाम विभाग कमालीचा सुस्त आहे. बांधकाम विभागाच्या या दुर्लक्षाला कोणाचे अभय मिळत आहे ? असा सवाल आता वाहनचालक आणि पादचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी एवढी दाट आणि काटेरी आहे की, यामुळे साईडपट्टी तर दिसत नाहीच उलट रस्त्याकडेने चालत असतांना काटेरी झुडपांचे काटे लागून पादचारी जखमी होत आहेत. तसेच शाळकरी मुले, वयोवृद्ध ग्रामस्थ, महिला यांना पदपथाअभावी जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. सद्यस्थितीत लोवले येथील एक मोरी अत्यंत धोकादायक झाली असून बुरंबी पूलाजवळील भरावही खचला आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्तच आहे. दाट झुडपे वाढल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्याच शिल्लक नसल्याने दोन मोठी वाहने एकाचवेळी पास होणे अवघड बनत आहे.
येत्या आठवडाभरात संगमेश्वर देवरुख मार्गावर दुतर्फा वाढलेली झाडी बांधकाम विभागाने न तोडल्यास शिवसेना वाहनचालक आणि पादचाऱ्यांना घेऊन जन आंदोलन करेल असा ईशारा शिवसेना संगमेश्वर शहर प्रमुख संजय कदम यांनी दिला आहे . बांधकाम विभाग वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असून यामार्गावर घडणाऱ्या अपघातास बांधकाम विभागाला जबाबदार धरुन शिवसेना लोकहितासाठी प्रसंगी न्यायालयात जाईल असा ईशाराही संजय कदम यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.































































