बेकायदा होर्डिंगची पालिकेला डोकेदुखी! ‘समर्थकां’च्या विरोधामुळे कारवाई करण्यात अडथळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नाक्यानाक्यावर लावलेले बेकायदा शुभेच्छा फलक पालिकेला डोकेदुखी ठरले आहेत. कारवाईसाठी जाणाऱ्या पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना संबंधितांच्या ‘समर्थकां’च्या विरोधाचा सामना करावा लागत असून मारहाणीचे प्रसंगही घडत आहेत. कारवाई करण्यासाठी आवश्यक असणारी पोलीस सुरक्षाही मिळत नसल्याने कारवाई कशी करणार, असा प्रश्न पालिकेला पडला आहे.

मुंबईतील बेकायदा होर्डिंगविरोधात पालिकेकडून कारवाई करण्यात येते. यासाठी सर्व 24 वॉर्डांमध्ये दोन इन्स्पेक्टर-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात येते. या कारवाईदरम्यान पालिकेला दोन कॉन्स्टेबल असणे आवश्यक असते, मात्र असे कॉन्स्टेबल पालिकेला मिळत नसल्याने कारवाई करण्यात अडचण येत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. यातच प्रत्येक सणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या फलकांमुळे मुंबईच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात बेकायदा होर्डिंगविरोधात कारवाई तीव्र करणार असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

1201 जणांविरोधात पोलिसांत तक्रारी, 478 एफआयआर
बेकायदा होर्डिंगविरोधात पालिकेकडून नियमितपणे कारवाई केली जाते. यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट 2018 पर्यंत एकूण 5729 बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. यानुसार प्रत्येक दिवशी पाच होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे. यातील 1201 होर्डिंगविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली असून तब्बल 478 जणांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

असे आकारले जाते शुल्क
पालिकेकडून होर्डिंग लावण्यास परवानगी घेतल्यानंतरच असे फलक लावता येतात. यानुसार गणेशोत्सव मंडपात फलक लावण्यास 101 रुपये आणि मंडपापासून 100 मीटरपर्यंत फलक लावण्यास 125 रुपये शुल्क आकारण्यात येते. यातून पालिकेला महसूल मिळतो.