
अमित खोत, मालवण
मत्स्यदुष्काळ, परप्रांतीय पर्ससीन व एलईडी लाईट मासेमारीचा सामना करणाऱ्या पारंपारिक मच्छीमारांसमोर सागरी कचऱ्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. समुद्राच्या पोटात मोठ्याप्रमाणात जमा होत असलेला प्लास्टिक व अन्य स्वरूपाचा कचरा मच्छिमारांच्या मासेमारी जाळीत सापडत असून मच्छिमार हवालदिल झाले आहेत.
तारकर्ली किनारपट्टीवर बुधवारी सकाळी मेथर रापण संघाने मासळीसाठी रापण टाकली. रापणीत मोठ्या प्रमाणात मासळी मिळेल यादृष्टीने रापण ओढली असता त्यात मासळी ऐवजी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कचरा सापडल्याने मच्छीमार चिंतेत पडले आहेत. मासळीऐवजी रापण जाळीत एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कचरा सापडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. दुपारी उशिरापर्यंत जाळीत अडकलेला कचरा बाजूला करण्याचे काम सुरू होते.
प्लास्टिक कचरा अधिक
गणेशोत्सवात गणेश मुर्तींसोबत निर्माल्यही पाण्यात सोडतात. निर्माल्यासाठी पिशव्या वापरल्या जात असल्याने तरंगणाऱ्या पिशव्या जाळीत अडकायला लागल्या आहेत. समुद्री पाण्याच्या प्रवाहात बदल झाल्याने दुसऱ्या ठिकाणाहून वाहत आलेला अथवा समुद्राच्या पोटात साठत असलेला कचरा समुद्राने किनाऱ्यावर फेकण्याची नैसर्गिक क्रिया केली असावी. त्यावेळी तो जाळीत सापडला असेही बोलले जात होते.
मृत समुद्राची (डेड सी) भीती
प्लास्टिकचा कचरा पाण्यावर तरंगत राहिल्याने सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे समुद्री खाद्य तयार होत नाही. याचा परिणाम मासे व समुद्री जीवसृष्टीवर होतो. याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी समुद्राचा तो भाग मृत (डेड सी) होतो. त्यामुळे पर्यटन व मासेमारी दृष्ट्या समृद्ध असलेला आपला समुद्र मृत होवू नये याची काळजी आपणच घेतली पाहिजे असे मत मालवण येथील मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी व्यक्त केले आहे.





























































