
सामना ऑनलाईन, बंगळुरू
अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले असंख्य राजकारणी आहेत, मात्र त्यांच्या अंधश्रद्धेमुळे जनतेला फुकट त्रास व्हायला लागला आहे. असाच प्रकार कर्नाटकात झाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रेवण्णा यांनी राहूकाळ असल्याने त्यांचे बंधू आणि मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना अजिबात भाषण करू दिलं नाही. कुमारस्वामी यांनी गयावया करूनही ते बधले नाहीत. रेवण्णा हे कट्टर अंधश्रद्धाळू आहेत. याच अंधश्रद्धेपायी ते रोज १७० किलोमीटरचा प्रवास करून बंगळुरूत येतात आणि काम करतात.
त्याचं झालं असं की उदयपूर भागात सिंचन प्रकल्पाच्या उद्गघानाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी कुमारस्वामी हे प्रमुख पाहुणे होते. गुरुवारी दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत राहूकाळ होता. हा काळ अशुभ मानला जातो, ज्यावर कुमारस्वामी यांचा भाऊ आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रेवण्णा यांचा गाढ विश्वास आहे. हा कार्यक्रम राहूकाळातच सुरू झाला होता. या काळात आपल्या भावाने भाषण करू नये असं रेवण्णांना वाटलं त्यामुळे त्यांनी कुमारस्वामी यांना ३ वाजेपर्यंत भाषण करायचं नाही असं बजावलं. कुमारस्वामी यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की मंत्रिमंडळाची बैठक आहे, मला जाऊ दे. तरीही रेवण्णा ऐकले नाहीत, त्यांच्या हट्टामुळे कुमारस्वामी यांना ३ वाजेपर्यंत इतरांची भाषणं ऐकत बसावी लागली. ३ वाजल्यानंतर त्यांनी भाषण केलं आणि मग हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करण्यात आलं.

























































