
सामना प्रतिनिधी । मुंबई
जगातील सर्वात मोठे मध्यमवर्गीयांचे मार्केट म्हणून हिंदुस्थानच्या नावाची ओरड होत असली तरी हिंदुस्थानात खरा मध्यमवर्ग फक्त नावालाच आहे. हिंदुस्थानात मध्यमवर्ग फक्त 2 टक्के असून बाकी सगळे गरीब असल्याचे समोर आले आहे, तर जगात एकूण 13 टक्केच मध्यमवर्ग आहे.
मध्यमवर्गीयांची नेमकी जागतिक व्याख्या काय आहे, हे समजण्यासाठी पी रीसर्च सेंटर स्टडीने एक सर्वेक्षण केले. यात जगभरातील लोकांच्या बदललेल्या उत्पन्नाचा आढावा घेतल्यानंतर 2000 साली पहिल्यांदा जागतिक गरिबीत घट झाली असल्याचे आढळले. मात्र गरिबी कमी होऊनही मध्यमवर्गात वाढ झलेली नसल्याचे आढळले.
हिंदुस्थानात 2011 साली गरीबांची संख्या घटली. ती 35 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आली. त्याचबरोबर मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढून ते 1 वरून 3 वर गेले. मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढले पण कनिष्ठ मध्यमवर्गीयांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली. हा वर्ग मोठय़ा प्रमाणावर 140 ते 700 रुपयांच्या आसपास दिवसाला कमवत आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील 95 टक्के लोक आजही मध्यमवर्गीयांपासून दूर आहेत. गरीबांची संख्या कमी झाली पण कनिष्ठ मध्यवर्गीयांची संख्या वाढली. उच्च मध्यमवर्गीयांची संख्या केवळ 0.3 टक्के तर श्रीमंतांची संख्या 0.1 टक्का इतकी आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.
मध्यमवर्गीयांची व्याख्याच माहीत नाही
हिंदुस्थानींना मध्यमवर्गीयांची व्याख्याच माहीत नाही. ते सरसकट स्वतःला मध्यमवर्गीय मानतात. त्यामुळे हिंदुस्थान ही जगातील मोठी बाजारपेठ आहे. कारण इथे जगातील सर्वात मोठा मध्यमवर्ग आहे, अशी जी बोंब केली जाते, ते खरी नाही. त्यामुळे केवळ नावापुरताच मध्यमवर्ग हिंदुस्थानात आहे. राहणीमानाचा विचार केला तर विकसित देश आणि हिंदुस्थानची तुलना करताच येणार नाही. हिंदुस्थानात जागतिक दर्जाशी मेळ खाणारा मध्यमवर्ग अजूनही अस्तित्वात आलेला नाही, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.
तरी आम्ही मध्यमवर्गीयच!
हिंदुस्थानातील प्रत्येक कुटुंबाला आपण मध्यमवर्गीय कुटुंब आहोत, असेच वाटते. मध्यमवर्ग आणि मध्यम उत्पन्न घेणारे एकाच गटात मोडत नाहीत. ते मध्यमवर्गीयांमध्ये मोडत नाहीत. त्या दोन वेगवेगळय़ा गोष्टी आहेत. मात्र सर्वेक्षणात असे आढळले की, शहरी, ग्रामीण, कमी उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट हे सगळेच आम्ही मध्यमवर्गीय आहोत, असे छातीठोकपणे सांगतात. पण ते खरे नाही, असे गेले अनेक वर्षे खपून तयार केलेल्या या सर्वेक्षण समितीतील सदस्यांचे मत आहे.
-सर्वेक्षणासाठी पाच गट करण्यात आले.
-जगभरात दिवसाला 140 रुपये उत्पन्न असलेल्यांना गरीब मानले जाते.
-दिवसाला 140 ते 700 रुपये उत्पन्न असलेल्यांना कनिष्ठ मध्यमवर्गीय मानले जाते.
-दिवसाला 700 ते 1400 रुपये कमवणाऱयांना मध्यमवर्गीय मानले जाते.
-अमेरिकेत मात्र दिवसाला 1120 रुपये कमवणाऱयाही गरीब मानले जाते.
-चीनमध्ये मध्यमवर्गीयांची संख्या वाढत असून ती 3 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर पोहोचली आहे.


























































