
सामना ऑनलाईन । नगर
आजच्या प्रत्येक जिजाऊने इतिहासकालीन शिवचरित्र डोळ्यासमोर ठेऊन आपल्या घरातील शिवाजीला घडवल्यास या समाजाचे भविष्य उज्ज्वल राहील असे प्रतिपादन चारिधाम मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बद्रिनाथ महाराज तनपुरे यांनी केले आहे. नगर जिल्हा मराठा सेवा संघ आणि अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा समाजातील मान्यवरांचा तनपुरे महाराज यांच्या हस्ते समाजभुषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी डॅा. संभाजीराव मिस्कीन, बार असोसिएशनचे संचालक अॅड. शेखर दरदंले, अॅड. शिवाजी कराळे, कांता बोठे आदि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर शिवप्रेमी कै. बबननराव मिस्कीन यांना मरणोत्तर समाजभुषण पुरस्कार देण्यात आला. तसेच ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. खासेराव शितोळे व महिला संघटन करण्यार्या जिजाऊ ब्रिगेडच्या माजी अध्यक्षा शोभाताई जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन विजयकुमार ठुबे होते. मराठा समाजाच्या अनेक नामवंत व्यक्तींनी सर्व समाजासाठी भरीव कार्य केले आहे. राजकारण, समाजकार्य, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात योगदान आहे. तरीही मराठा समाजाचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत ही शोकांतिका असल्याची खंत तनपुरे महाराज यांनी व्यक्त केली.































































