
सामना ऑनलाईन । बुलढाणा
बुलढाण्यात दोन जणांची अतिशय निर्घृणपणे हत्या करून त्यांचे मृतदेह विक्षिप्त अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील खडका गावाच्या शिवारात दोन अज्ञात व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून त्यांची हत्या करुन, त्यांची ओळख पुसण्यासाठी त्यांचे डोकं, चेहरा दगडाने ठेचला आहे. शनिवारी संध्याकाळी अशीरापर्यंत दोनही मृतांचीह ओळख पटली नव्हती.
देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खडका गावातील माळरानवावर गवतात दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या झालेल्या दोघांचीही ओळख पटलेली नाही . यातील एकाचे वय अंदाजे 50 ते 55 वर्ष तर दुसऱ्याचे 35 ते 40 वर्ष असून एकाच्या हातावर मधुकर घोलप असे लिहिलेले असूल हनुमानाचे चित्र गोंदलेले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील तत्काळ घटनास्थळी पोहचले असून श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू आहे. हत्या झालेले दोघे कोण आहेत आणि त्यांची हत्या कोणी व कशासाठी केली याचा उलगडा करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

























































