
सामना ऑनलाईन । कुलु
हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी झाली असून बर्फवृष्टीमुळे राज्यातील दळणवळणच ठप्प झाले आहे. व्याससहीत अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने रस्ते वाहून गेले आहेत, पूल बेपत्ता झाले आहेत. सर्वत्र हाहाकार उडालेला असून जवळपास 45 पर्यटक बेपत्ता असल्याचे समजते. बेपत्ता पर्यटकांमध्ये आयआयटीच्या 35 विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर 2 परदेशी नागरिक आहेत.
आयआयटी रुरकीचे 35 विद्यार्थी हे हमटा पासजवळ ट्रेकींग करायला गेले होते. त्यांना शेवटचे लहौल स्पिटीजवळ पाहण्यात आले होते. त्यानंतर अद्याप त्यांचा काहीच पत्ता लागलेले नाही. मात्र कुलुचे उपायुक्त युनुस यांनी मात्र अद्याप अशा प्रकारची कोणतीही तक्रार त्यांच्याजवळ आली नसल्याचे सांगितले आहे. ‘आयआयटीचे वि्द्यार्थी बेपत्ता असल्याबाबत आम्हाला काहीही माहीत नाही. कुणी तशी तक्रार केलेली नाही. आज सकाळी लहौल स्पिटीजवळ अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, असे युनुस यांनी सांगितले.
सलग पडणारा पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रा स्थगित
हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून वादळी पाऊस होत आहे. अनेक वर्षानंतर सप्टेंबरमध्ये बर्फवृष्टी झाली असून त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे कुलु मनाली, रोहतांग, लेह, सिमला हे राष्ट्रीय महामार्ग बंदच झाले आहेत. राज्यभरात जवळपास 300 रस्त्यांवर गुडघाभर बर्फ साचल्याने जागोजाग वाहने फसली आहेत. रोहतांग दर्रा या मार्गावर चार फूट बर्फ साचला आहे.
SUMMARY : 35 students from IIT gone missing in Lahaul Spiti

























































