पेट्रोलचे दर पुन्हा भडकले,मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता शहरांत 14 पैशांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पेट्रोलचे दर कमी व्हायचे नावच घ्यायला तयार नाहीत. आज सहाव्यांदा पेट्रोलचे दर पुन्हा गगनाला भिडले. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या चार शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात 14 पैशांची वाढ झाली. डिझेलच्या दरातही वाढ झाली असून महागाईच्या आगीत आणखी तेल ओतले गेले आहे. सरकार व्हॅट कमी करायला तयार नाही. त्यामुळे पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. 1 सप्टेंबरपासून मुंबईत पेट्रोलच्या दरात 4 रुपये 13 पैशांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 93 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल लिटरमागे 82.86 रुपये, डिझेल 74.12 रुपये, कोलकात्यात पेट्रोल 84.68, डिझेल 75.97 रुपये तर चेन्नईत डिझेल 86.13 रुपये प्रति लिटर, डिझेल 78.36 रुपये प्रति लिटर इतके झाले आहे. रुपयाची सातत्याने होणारी घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

रुपयाची घसरण सुरूच

रुपयाची घसरण सातत्याने सुरूच आहे. आज रुपया डॉलरच्या तुलनेत 26 पैशांनी घसरला आणि 72.89 वर पोहोचला. क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरलमागे प्रचंड वाढले असून चार वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. एका बॅरलसाठी 5.920 रुपये मोजावे लागत आहेत.

शेअर बाजार सावरला

सलग पाचवेळा मोठी घसरण पाहिल्यानंतर आज शेअर बाजार सावरल्याचे चित्र होते. बाजार उघडताच आज तेजी दिसली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा जीव भांडय़ात पडला. शेअर बाजारात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आज शेअर बाजार 347.04 अंकांच्या वाढीसह 36,652.06 अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 100.05 अंकांची वाढ होऊन तो 11,067.45 अंकांवर पोहोचला. ऑक्सिस बँक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, मारुती, सन फार्मा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारल्यामुळे शेअर बाजार उंचावला.