
सामना ऑनलाईन, मुंबई
बीसीसीआयने कडक नियमावली तयार केली असून त्यानुसार प्रत्येक खेळाडूला ‘यो यो टेस्ट’ द्यावी लागणार आहे. खेळाडूंच्या फिटनेसची इत्थंभूत माहिती देणाऱ्या या टेस्टमध्ये 16.1 गुण मिळणे अनिवार्य आहे. हिंदुस्थान व वेस्ट इंडीज यांच्यामध्ये 4 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी कर्णधार विराट कोहलीलाही ‘यो यो टेस्ट’ द्यावी लागणार आहे. तसेच रविचंद्रन अश्विन व इशांत शर्मा या गोलंदाजांच्या फिटनेसची चाचणी होणार आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत राष्ट्रीय निवड समिती कोणाकोणाला संधी देतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे.
युजवेंद्रला संधी मिळेल?
इशांत शर्मा व रविचंद्रन अश्विन या गोलंदाजांची यो यो टेस्ट होणार आहे. त्यामुळे त्यांचा समावेश त्यांच्या फिटनेस चाचणीनंतरच निश्चित होईल. लेगस्पिनर युजवेंद्र चहलला कसोटीत संधी मिळतेय का हे पाहायला नक्कीच आवडणार आहे. कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा यांचेही स्थान जवळपास निश्चित आहे. तसेच भुवनेश्वरकुमार व जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देऊन युवा वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात येईल ही शक्यताही नाकारता येत नाही.
शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल यांना इंग्लंड दौऱ्यात अपयशाचा सामना करावा लागला. त्यामुळे सलामीला कोणत्या खेळाडूंची निवड होईल हे पाहणेही रंजक ठरणार आहे. शिखर धवन, लोकेश राहुल मायदेशातील कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडतील, पण ऑस्ट्रेलियात पोहचल्यावर त्यांचा फ्लॉप शो सुरू होईल. याच पार्श्वभूमीवर मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉला आगामी विंडीजविरुद्धच्या मालिकेत संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

























































