
किशोर जाधव । किल्लारी
२५ वर्षांपूर्वी किल्लारीत झालेल्या भूकंपातून किल्लारीकर सावरलेही. भूकंपाने त्यांच्या मनावर केलेली जखमही एव्हाना बरीही झाली असेल. त्यानंतर जन्माला आलेल्या एका नव्या पिढीला या उत्पाताची काहीच कल्पना नाही. तरीही ज्यांनी हा भूकंप अनुभवलेला आहे त्यांच्या मनावर जखमेची खपली मात्र निश्चित उरली आहे. कारण या भूकंपात त्यांना त्यांचं सर्वस्व गमवावं लागलं होतं. २५ वर्षांपूर्वीचा किल्लारीतील थरकाप आणि विध्वंस अजूनही आठवतोय.
भूकंप झाल्यावर काही दिवसांनी किल्लारी परिसरात फिरताना पाहिलेली दृश्य हादरवणारी होती. ती आजही डोळ्यांसमोर तरळतात तेव्हा मनाचा थरकाप उडवतात. भूकंपाचा सगळ्यात मोठा हादरा बसला होता तो लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारीला. बारा-पंधरा हजार लोकवस्तीचे हे बाजारपेठेचे गाव भूकंपाने अक्षरश: उध्वस्त केले होते. गावांतली सगळी दगडी घरं जमीनदोस्त झालेली. त्यांचा जणू ढीग झालेला. गावभर मृतदेह पडलेले… पुरुषांचे, महिलांचे, लहान मुलांचे… सगळीकडे दु:ख, हताशा, निराशा यांनी भरलेलं वातावरण. प्रत्येक घरातलं कुणी ना कुणी गेलेलं.. काही घरांतली दहा-बारा-चौदा माणसं गेलेली. जे वाचले होते त्यांच्या डोळ्यांतही हा मसणवटा पाहायला मी कशाला मागे उरलो, असा आक्रोश स्पष्ट दिसत होता.
किल्लारीच नव्हे तर मंगरूळ येळवट, सिरसल, नदी हातरगा, हरेगाव , लिंबाळा, बाणेगाव, तळणा अशा आजूबाजूच्या सगळ्याच गावांत हे दृश्य पाहायला मिळत होतं. केवळ गावाचं नाव वेगळं, एरवी भूकंपाचा उत्पात सगळीकडे सारखा. लातूर – किल्लारी या भूकंपाने नेमके किती बळी घेतले, याचा आकडा आजही वेगवेगळा सांगितला जातो. महाराष्ट्र सरकारच्या लातूर जिल्ह्याच्या वेबसाइटवर मृतांचा आकडा ७ हजार ९२८ इतका आहे तर काहीजण या भूकंपात दहा हजारहून अधिक मृत्युमुखी पडले असा दावा करतात. अर्थात सरकारी आकड्यांवर विश्वास ठेवला तरीही या भूकंपाने केलेल्या हाहाकाराची तीव्रता कमी होत नाही.
किल्लारी परिसरात ११ ऑक्टोबर १९९२ रोजी भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यानंतर १९९३ पर्यंत अनेक लहान सहान भूकंपाचे धक्के बसत होत. या धोक्याकडे ना सरकारने लक्ष दिलं ना गावकऱ्यांनी तो ओळखला. कुणी म्हटलं की, इथल्या तेरणा नदीवर बांधण्यात आलेल्या माकणी धरणामुळे हा भूकंप झाला.
किल्लारीतील भूकंप मापन यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा

भूकंपाची माहिती नागरिकांना कळावी यासाठी खासदार निधीतून त्यानंतर किल्लारी पुनर्वसनाच्या पूर्व भागात लाखो रुपये खर्च करून खूप मोठी इमारत उभारली आहे. भूकंप शास्त्र संशोधन केंद्र आणि भूकंपीय वेध शाळा उभारण्यात आली. त्यात भूकंप मापन यंत्र बसवण्यात आले. सुरुवातीला काही दिवस कार्यरत असलेली ही यंत्रणा मध्येच बंद पडली. येथे झालेली भूकंपाची तीव्रता यांचा केंद्रबिंदू याबाबतची माहिती समजण्याचा उद्देशाने उभारलेली ही यंत्रणा किल्लारीकरांसाठी सद्या असून अडचण नसून खोळंबा झाली आहे.
दक्षिण अफ्रिका सरकारने दिलेले स्वयंचलीत ऑपरेशन थिएटर धूळ खात

भूकंपातील अनेक जखमींना तात्काळ मोठ्या दवाखान्यात पाठवण्याची सोय होत नसल्याने अनेकांवर उपचार होत नव्हते. त्यावेळी दक्षिण अफ्रिका सरकारने करोडो रुपयांचे स्वयंचलीत चलते फिरते ऑपरेशन थिएटर व तज्ञ डॉक्टरांची टीम किल्लारीला पाठवली होती. त्यामुळे अनेक जखमीचे प्राण वाचले. नंतर ही यंत्रणा अफ्रिका सरकारने किल्लारी ग्रामीण रुग्णालयास दान दिली. आज हीच करोडो रुपयांची यंत्रणा धूळ खात किल्लारीत पडून आहे.
शासन उदासीन,किल्लारीकडे दुर्लक्ष
पंचवीस वर्ष उलटूनही आज अनेक समस्या येथे आ वासून उभ्या आहेत. दोन दशकांपूर्वी पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा आजही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अनेक प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यासाठी अनेकदा ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. अनेक घरांचे कबाले वाटप झाले नाही. ८ व्या व ९ फेरीचे कबाले वाटप न झाल्यामुळे त्यांच्या पाल्यांना भूकंपग्रस्त दाखला मिळत नाही म्हणून ते शासकीय लाभापासून वंचित राहत आहेत.
भूकंपग्रस्त गावाचा श्वास गुदमरला
ज्या पध्दतीने घराचे वाटप झाले त्यावेळी शासनाने अनेक निकष लावले होते. त्यात प्रामुख्याने शेतीच्या क्षेत्रावरून व लग्न झालेल्या नोंदीवरून घराचे वाटप झाले. त्यात अ ब क असे गट करण्यात आले परंतु आज लहान मुले प्रौढ झाली. पर्यायाने लोकसंख्या वाढली पण दिलेल्या घराचे क्षेत्रफळ वाढले नाही. त्यामुळे अपुऱ्या जागेवाचून भूकंपग्रस्तांचा श्वास गुदमरत आहे.
जुने गावठाण भूकंपानंतर १/१२/१९९५ रोजी एक शासन निर्णय झाला होता. त्यात पुनर्वसित गावात घरे मिळाल्यास ९० दिवसांच्या आत जुन्या गावठाणातील जागा शासनास वर्ग होईल असा निर्णय होता. परंतु असे असतांनाही आज गावठाणाच्या बाजूला असणाऱ्या शेत जमीन मालकांनी आपल्या शेतीचे क्षेत्र जुन्या गावठाण्यात अतिक्रमित केले आहेत. आज जमिनीचे गगनाला भिडलेले भाव पाहता हा कळीचा मुद्दा ठरत आहे. नंतर हे जुने गावठाण सामाजिक वनीकरणास वर्ग करूनही हा प्रश्न मिटलेला नाही.
पुनर्वसित घरांचे आयुष संपले
भूकंपानंतर किल्लारीचे पुनर्वसन मोठा गाजावाजा करून झाले असले तरी बांधलेल्या घरांचे आयुष्य संपुष्टात आल्याचे दिसत आहे. टाटा, किर्लोस्कर या सारख्या नामांकित कंपनीच्या देखरेखेखाली ‘मुळे कंस्टक्शन, संभाजीनगर’, ‘केटी कंस्ट्रक्शन, मध्य प्रदेश’, ‘हैद्राबाद आयव्हीआर, कोयला’, ‘सहारा’ अशा अनेक कंस्टक्शन कंपनींनी घरांचे बांधकाम पूर्ण केले. परंतु या घरांची गुणवत्ता पाहता ही घरे आजच खिळखिळीत झाली आहेत. अनेक घरांना तडे गेले आहेत. छत गळून पडली आहेत. यापुढे आणखी मोठा धक्का बसला तर १९९३ ची पुनरावृत्ती होईल.




























































