
सामना प्रतिनिधी । बीड
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सरकारने मला अटक केली, कारागृहात डांबले, शंभर कोटीचे महाराष्ट्र सदन आणि भाजपा सरकार म्हणतयं आठशे कोटीचा घोटाळा झाला. भुजबळांना रोखण्याचे काम या सरकाने केले मात्र अडथळे कितीही आणा, चालत राहणार लढत राहणार हा विश्वास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
बीड येथे राज्यातील पहील्या समता परिषद मेळाव्याच्या निमित्ताने छगन भुजबळ आले होते. व्यासपीठावर विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आ.जयदत्त क्षीरसागर, माजी आ. प्रकाश सोळंके, मा.आ. अमरसिंह पंडीत यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. आपल्या भाषणामध्ये पुढे बोलतांना छगन भुजबळ म्हणाले, ज्या महाराष्ट्र सदनमध्ये घोटाळा झाल्याचे भाजपा सांगत आहे. त्याच महाराष्ट्र सदनमध्ये अमित शहा बैठका घेतात. काँग्रेसचे राहूल गांधी पत्रकार परिषद घेतात. मला अभिमान आहे महाराष्ट्राची मोठी आणि भव्यदिव्य वास्तू दिल्लीमध्ये उभी राहीली. पुढे बोलतांना ते म्हणाले, मला अडचणीत आणण्याचे काम सरकारने केले आहे. कितीही अडचणीत आणा. मी चालत राहणार. मी लढत राहणार. हे सरकार कसे चालत आहे याचे आश्चर्य वाटते. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद करण्यात आल्या. आयआयटी मधील आरक्षण काढून घेण्यात आले. अर्ध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा बंद केला जात आहे. पाऊस नाही. पाणी नाही आणि सरकार रोज नवीन कायदे तयार करत आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले, आम्ही ब्राम्हण विरोधी नाहीत. मात्र मनुवाद पुढे येतोय. संपूर्ण महाराष्ट्र एकसंघ उभा राहिला पाहीजे, असे ते म्हणाले. प्रास्तावीक समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांनी केले.
शिवसेनेच्या भूमिकेचे अभिनंदन करतो
मराठा आरक्षणामुळे संपूर्ण राज्यात चळवळ निर्माण झाली. या मराठा आरक्षणाला शिवसेनेने पाठिंबा दिला. मी शिवसेनेच्या या भूमिकेचे अभिनंदन करतो. जातीला नाही तर पोटाला आरक्षण द्या, ही भूमिका आतापर्यंत शिवसेनेने मांडली होती. मात्र आपल्या भूमिकेत त्यांनी बदल केल्यामुळे मी शिवसेनेला धन्यवाद देतो, असे आपल्या भाषणात छगन भुजबळ म्हणाले.

























































