पवारांची खलबते आता विश्रामगृहावर; जेवण रत्नसुंदरवर, नाष्टा शिवछत्रवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी, बीड

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बीडमध्ये दाखल होत आहेत. मुक्कामाचे राजकारण नको म्हणून त्याच्या मुक्कामाचे ठिकाण पुन्हा बदलण्यात आले, आता रात्रीचे जेवण ‘रत्नसुंदर’वर मुक्काम शासकीय विश्रामगृहावर, सकाळचा नाश्ता ‘शिवछत्र’वर असा राष्ट्रवादीच्या सर्व सरदारांना खूश करणारा दौरा आखण्यात असून पक्षाची खलबते आता विश्रामगृहातच होणार आहेत.

बीड जिल्हा आणि शरद पवार यांचा स्नेह व ऋणानुबंध तसा खूप जुना. स्व. सुंदरराव सोळुंके, माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार मोहनराव सोळुंके, माजी आमदार राधाकृष्ण पाटील, स्व. केशरकाकू क्षीरसागर, स्व. बाबुराव आडसकर यांनी पवारांना गरज पडेल तेव्हा साथ दिली. एक वेळ तर बीड जिल्ह्यातील सर्वच आमदार पवारांच्या बाजूचे होते अशी ही परिस्थिती होती. काळाच्या ओघात बीडमध्ये पवारांना अपयश सहन करावे लागले. मात्र त्यांचे समर्थक नेहमीच मजबूत आणि ताकदवर राहिले आहेत. पवार जेव्हा जेव्हा बीड मध्ये दाखल झाले तेव्हा तेव्हा राष्ट्रवादीला ऊर्जा देऊन गेले हा इतिहास आहे.

आजही राष्ट्रवादीच्या मेळाव्यानिमित्त ते बीडमध्ये दाखल होत आहेत. गटातटात विभागलेल्या राष्ट्रवादीच्या सरदारांना खूश करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. शरद पवार आज पाच वाजेपर्यंत बीडमध्ये येणार आहेत. दाखल झाल्यानंतर ते थेट संदीप क्षीरसागर यांच्या काकू नाना मेमोरियल रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. तेथून ते धैर्यशील सोळुंके यांच्या रत्नसुंदर निवासस्थानी रात्रीच्या जेवण्यासाठी जाणार असून रात्री उशिरा मुक्कामासाठी विश्राम गृहावर जातील. सोमवारी सकाळी नाश्ता आमदार अमरसिंह पंडित यांच्या ‘शिवछत्र’वर करणार असून तेथून मेळाव्याला जाणार आहेत. दुपारचे जेवणही पंडितांकडेच ते करणार आहेत. दुपारी जेवण करून ते बीड दौरा आटपणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची राजकीय खलबते अखेर विश्रामगृहावरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

summary- sharad pawar on beed tour