वर्षात एखादाच जवान मरतो, नुकसानभरपाई वाढवून देऊ, भाजप मंत्र्याचे बेताल वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लष्कराच्या ‘ऑपरेशन’मध्ये आमच्या हरयाणातील एखादाच जवान वर्षभरात मरत असतो, असे असंवेदनशील आणि बेताल वक्तव्य मोदी सरकारमधील केंद्रीय पोलाद मंत्री बिरेंदर सिंग यांनी हरयाणातील जिंद जिल्ह्यात केले. ते ‘पराक्रम पर्वा’निमित्त आयोजित एका समारंभात शहीद जवानांच्या कुटुंबीयांसमोर बोलत होते.

मोदी सरकारने ‘सर्जिकल स्ट्राइक’चा दुसरा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी शनिवारचा दिवस ‘पराक्रम पर्व’ म्हणून साजरा केला. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमातच केंद्रीय मंत्री बिरेंदर सिंग यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखावर जणू डागण्याच दिल्या. त्यावरून त्यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बिरेंदर सिंग यांनी आपल्या बेताल वक्तव्याबद्दल त्वरित माफी मागावी, अशी मागणी अनेक पक्षांनी केली आहे.

हरयाणाचा एखादाच जवान वर्षभरात लढताना मरतो, असे विधान करतानाच बिरेंदर सिंग यांनी ‘‘शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी भरपाईची रक्कम वाढवून द्यायला आपण मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना सांगू,’’ असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र सीमेवर देशाचे जवान रोजच शहीद होत असताना आणि शत्रू राष्ट्राकडून त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली जात असताना शहीदांच्या हौतात्म्याबद्दल केंद्रीय मंत्र्याने बेदरकारपणा दाखवला आहे. त्यामुळे मोदी सरकारविरोधात शहीद जवानांच्या कुटुंबीयांत संतापाची लाट उसळली आहे.

याआधी ‘‘लष्कराचे जवान मरण्यासाठीच तर असतात!’’ असे भयंकर वक्तव्य बिहारमधील भाजपचे पंचायतराज मंत्री भीमसिंग यांनी केले होते. त्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली होती.

summary- bjp leader gave controversial statement on soldiers