
>>वैभव मोहन पाटील<<
दरवर्षी मुंबई शहरात 70 ते 80 हजार लोकांना हे कुत्रे चावण्याचे प्रकार घडत असताना तक्रारींचे प्रमाण मात्र नगण्य आहे. यावरून आपण ही समस्या बिलकूल गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. मुंबईत दर दहा माणसांमागे सात कुत्री व दर एका किलोमीटरच्या परिसरात दहा कुत्री असल्याचेदेखील ह्युमन इंटरनॅशनल संस्थेस आढळले आहे. यावरून या कुत्र्यांच्या भविष्यातील जाचाची दाहकता आपल्या लक्षात येईल. उद्या जागतिक लोकसंख्या नियंत्रण दिनासारखा भटके कुत्रे नियंत्रण दिवस साजरा करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले.
दोन दिवसांपूर्वी ‘जागतिक रेबीज लसीकरण दिन’ पाळण्यात आला. रेबीजच्या विषाणूंवर ऑण्टि-रेबीज लसीचा शोध लावणाऱ्या लुईस पाश्चर यांची पुण्यतिथी सर्वत्र रेबीजविरोधी दिन म्हणून पाळला जातो. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास रेबीजची लागण होते हे सर्वज्ञात आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या आज सर्वच शहरांची मोठी समस्या बनली आहे. एखाद्या गल्लीतून जावं आणि समोर कधी कुत्रा येईल आणि चावेल याचा नेम नाही. नाशिकसारखे शहर सध्या कुत्र्यांच्या दहशतीत आहे. नाशिकच्या विविध भागांत कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय. नाशिकमध्ये एका दिवशी कुत्रे सरासरी 35 जणांचा चावा घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वीस दिवसांत 1167 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलाय, तर 1 एप्रिलपासून तब्बल 4748 लोकांना कुत्रे चावलेत.
मोकाट जनावरांबरोबरच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सर्वत्र मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. अनेक वेळा भटके कुत्र्यांनी चावा घेण्याबरोबरच नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या वर्षभरात जवळपास तीन हजारांच्या आसपास लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या आहे, तर मागील चार महिन्यांत जवळपास 500 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांची नोंद आहे. खासगी रुग्णालयांत आणखी रुग्ण असण्याचीदेखील शक्यता आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या सर्वच प्रमुख शहरांत वाढली आहे. कुत्र्यांना महापालिकेचे कर्मचारी पकडून नेतात, त्यांच्यावर नसबंदी करून पुन्हा परिसरात सोडतात. तरीदेखील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. अनेक ठिकाणी सोसायटय़ांच्या पार्ंकगमध्ये भटकी कुत्री बिनबोभाट फिरत असतात. रात्री-अपरात्री ओरडत असतात. नवी मुंबईसारख्या स्मार्ट शहरात पालिका रुग्णालयात वर्षाला तब्बल 12 ते 13 हजार श्वानदंश झालेले रुग्ण दाखल होत असल्याची माहिती खरंच धक्कादायक आहे. पालिकेतर्फे श्वानांना ऑण्टिरेबीज लस दिली जात असून त्यासाठी संबंधित लसीकरण करणारी एजन्सी, प्राणिमित्र संघटना, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचीही मदत घेतली जात आहे. मात्र त्याचवेळी शहरातील पालिका रुग्णालयांत श्वानदंश झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. नवी मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या 30 हजारांच्या घरात गेली आहे. ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत पालिका हद्दीतील कुत्रे पकडून आणून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते. तसेच त्यांना रेबीजची लसही दिली जाते. मात्र श्वानदंश झालेल्या रुग्णांची वर्षभरातील संख्या पाहता महिन्याला किमान हजार रुग्ण श्वानदंशासाठी उपचार घेण्यासाठी येत आहेत. ही संख्या फार मोठी आहे आणि तितकीच गंभीरही आहे. मागील पाच वर्षांचा मागोवा घेतला असता नवी मुंबईतील वाशी येथील पालिका रुग्णालयात श्वानदंशाच्या रुग्णांची संख्या दीडशे-दोनशेने वाढत आहे. मात्र पालिका रुग्णालयात उपचारासाठी पालिका हद्दीबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या 40 ते 50 टक्के आहे. त्यामुळे श्वानदंशाचे पालिका हद्दीबाहेरील रुग्ण अधिक असल्याचे दिसून येते. नवी मुंबई पालिकेला लागून असलेल्या पनवेल शहराचा ग्रामीण भाग, उरण परिसर आणि मुंबईतील मानखुर्द, गोवंडीमधून येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. गतवर्षी ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार एकटय़ा मुंबई शहरात जवळपास 95 हजारांच्या वर भटक्या कुत्र्यांची अधिकृत संख्या आढळून आली. भटक्या कुत्र्यांच्या जाचाला समाजातील सर्व स्तरांतील नागरिक कंटाळलेले आहेत. न्यायालयानेदेखील मागील वर्षी एका प्रकरणात निकाल देताना माणसाच्या आयुष्यापेक्षा कुत्र्याचे आयुष्य महत्त्वाचे असूच शकत नसल्याचे अत्यंत महत्त्वपूर्व निरीक्षण नोंदविले आहे, परंतु आज जर आपण त्यांचा उपद्रव व लोकांच्या त्यावरील प्रतिक्रिया पाहिल्या तर या समस्येकडे लोक इतके दुर्लक्ष कसे करू शकतात याचेच अप्रूप वाटते. दरवर्षी मुंबई शहरामधे 70 ते 80 हजार लोकांना हे कुत्रे चावण्याचे प्रकार घडत असताना तक्रारींचे प्रमाण मात्र नगण्य आहे. यावरून आपण ही समस्या बिलकूल गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. मुंबईत दर दहा माणसांमागे सात कुत्री व दर एका किलोमीटरच्या परिसरात दहा कुत्री असल्याचेदेखील ह्युमन इंटेरनॅशनल संस्थेस आढळले आहे. यावरून या कुत्र्यांच्या भविष्यातील जाचाची दाहकता आपल्या लक्षात येईल. उद्या जागतिक लोकसंख्या नियंत्रण दिनासारखा भटके कुत्रे नियंत्रण दिवस साजरा करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले. सर्व महानगरपालिका व त्यांच्या झोपडपट्टी क्षेत्रांमध्ये कमी अधिक फरकाने ही समस्या वाढली आहे. महानगरपालिकांनी तातडीने या समस्येकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे. शासन आज विनामूल्य ऑण्टिरॅबीज लस उपलब्ध करून देत आहे, पण रस्त्यावर त्रासदायक ठरणाऱ्या या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची व नियंत्रण पथकांमार्फत कारवाई करणारी प्रक्रिया परिणामकारकरीत्या राबवणे जनतेच्या हिताचे ठरू शकेल. महानगरपालिकांनी अत्यंत संवेदनशील विषय म्हणून या समस्येकडे पाहावे.


























































