मोदी सरकार राम मंदिराची जबाबदारी टाळत आहे!परमहंस दास यांचे उपोषण सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, अयोध्या

प्रभू रामचंद्र यांच्या नावावर मते मिळवून सत्ता काबीज करणाऱ्या भाजपचे सरकार आता राम मंदिर उभारण्याची जबाबदारी टाळत आहे असा स्पष्ट आरोप करत परमहंस दास यांनी आजपासून राम मंदिरासाठी आमरण उपोषण सुरू केले. त्यांनी अन्नासहीत पाण्याचाही त्याग केला असून मोदी सरकारने राम मंदिर उभारण्याची घोषणा केल्याशिवाय आपले उपोषण थांबणार नाही, असे जाहीर केले आहे.

मागील लोकसभा निवडणुकीवेळी राम मंदिर हा भाजपचा प्रमुख अजेंडा होता, पण नंतर मंदिराच्या उभारणीसाठी भाजप सरकारने जराही हालचाल केलेली नाही. त्यामुळे साधुसंतांमध्ये कमालीचा असंतोष आहे, असे परमहंस दास म्हणाले.

आपल्या उपोषणाची माहिती राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे असे सांगून ते म्हणाले की, भाजपने राम मंदिराच्या मुद्दय़ावरून ‘पलटी’ मारल्यामुळे आपणास उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे. आमची लढाई मुसलमानांशी नाही, भाजपशी आमची विचारांची लढाई आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

बघता बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आलाय, पण राम मंदिराच्या उभारणीची आमची इच्छा मात्र अपूर्णच राहिलेली आहे. त्यामुळे  या प्रश्नावर आम्हालाच मर्दुमकी गाजवावी लागेल. मग बलिदान द्यावे लागले तरी बेहत्तर- परमहंस दास