रेशन दुकानावर मीठ, संभाजीनगरात होणार ‘श्रीगणेशा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

रेशन दुकानातील एकएक वस्तू दिवसेंदिवस कमी होत असताना लोह व आयोडिनयुक्त मीठ याच दुकानात उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देशात आणि राज्यात अ‍ॅनेमियाचे प्रमाण वाढत असल्यामुळे ही उपाययोजना अमलात आणली जात आहे. टाटा ट्रस्टच्या साह्याने हे मीठ येत्या ऑक्टोबर महिन्यापासून संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला देण्यात येणार आहे.

सणांच्या काळात रेशन दुकानांमधून साखर, गहू, तांदूळ या धान्यासोबत रवा, मैदा, पामतेल आणि डाळी देण्यात येत होत्या. आता हा इतिहास झाला. आता गहू, साखर, तांदूळ वेळेवर मिळत नसल्याने गोरगरिबांना या वस्तू बाजारातून खरेदी कराव्या लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असताना आता रेशन दुकानांमध्ये मात्र आयोडिनयुक्त मिठाचे वाटप करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. त्यासंबंधीचा आदेशही जारी करण्यात आला आहे.

राज्यात अ‍ॅनेमियाचे प्रमाण वाढत असून, २०१५-१६च्या चौथ्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सव्र्हेक्षणानुसार महाराष्ट्रातील ५३.८ टक्के मुलांमध्ये (वय सहा महिने ते पाच वर्षे), १५ ते ४९ वर्षे वयाच्या महिलांमध्ये ४८ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर अ‍ॅनेमिया असल्याचे दिसून आले. पूरक ठरतील अशा उपाययोजना करणे आवश्यक असल्यामुळे रेशन दुकानातून लोह व आयोडिनयुक्त मीठ वितरित करण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टद्वारे राज्य सरकारला देण्यात आला होता. त्यानुसार हे मीठ टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर पुणे व नागपूर शहरातील रेशन दुकानांतून वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. आता ऑक्टोबर महिन्यापासून संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमधून ते वितरित करण्यात येणार आहे.