
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत 10 ऑक्टोबरपासून रस्त्याच्या कामांचा धडाका सुरू होणार आहे. यामध्ये 507.62 कि.मी. लांबीच्या 1 हजार 343 कामांचा समावेश आहे. यामध्ये विविध जंक्शनची कामेही केली जाणार आहेत. यामध्ये दुरुस्ती आणि नवीन कामे केली जाणार असल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकारक होणार आहे.
पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असणारी काही विकास कामे पावसाळय़ानंतर पुन्हा सुरू केली जातात. यामध्ये विशेष महत्त्वाच्या असणाऱया रस्त्याच्या कामांचा समावेश असतो, मात्र रस्त्याच्या कामांमध्ये वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेता वाहतूक पोलिसांची परवानगी घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून 10 ऑक्टोबरपासून हे काम सुरू केले जाईल, अशी माहिती एका पालिका अधिकाऱयाने दिली.
305 कि.मी.चे 719 रस्ते
पावसाळय़ामुळे थांबवण्यात आलेल्या कामांमध्ये 305.08 कि.मी. लांबीच्या 719 रस्त्यांचा समावेश आहे. यामधील 238.45 कि.मी. लांबीच्या पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणाऱया ‘प्रकल्प रस्त्यां’चा समावेश आहे. याव्यतिरिक्त ‘प्राधान्यक्रम-2’ या वर्गवारीतील राहिलेल्या 7.71 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची व ‘प्राधान्यक्रम-3’ अंतर्गत 58.92 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामेही हाती घेतली जाणार आहेत.
असे होणार काम
– आता करण्यात येणाऱया कामामध्ये पावसाळय़ामुळे थांबवण्यात आलेल्या 719 आणि नवीन 1 हजार 343 रस्त्यांच्या व जंक्शनच्या दुरुस्ती कामांचा समावेश आहे.
– रस्त्यांच्या कामांमध्ये नुकत्याच काढण्यात आलेल्या निविदांमधील 202.31 कि.मी. लांबीच्या 624 रस्त्यांचा समावेश आहे.
– या कामांमध्ये शहर भागातील 46.16 कि.मी. लांबीच्या 199 रस्ते कामांचा समावेश आहे, तर पूर्व उपनगरातील 47.89 कि.मी. लांबीच्या 155 रस्ते आणि पश्चिम उपनगरातील 108.26 कि.मी. लांबीच्या 270 रस्त्यांचा समावेश आहे.
– उर्वरित 305.08 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची 719 कामे ही पावसाळय़ामुळे थांबविण्यात आली होती. यामध्ये 1 लाख 31 हजार 8 चौरस मीटर एवढय़ा क्षेत्रफळाच्या जंक्शनच्या कामांचा समावेश आहे.
























































