नाराज भाजप आमदारांना आशीष देशमुखांचे पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

महाराष्ट्रातील भाजपचे सरकार नपुंसक आणि वांझोटे सरकार आहे अशा शब्दांत डॉ. आशीष देशमुख यांनी तोफ डागली. माझ्यासारखेच अनेक भाजप आमदार नाराज असून मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नाराज आमदार राजीनामे देतील. भाजपमधील नाराज आमदार-खासदारांच्या अंतर्मनाला व विवेकाला साद घालणारे पत्र आपण लवकरच पाठवणार आहोत, असेही ते म्हणाले.

भाजपमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून डॉ. आशीष देशमुख यांनी 2 ऑक्टोबरला भाजपला सोडचिठ्ठी देत आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. देशमुख हे नागपूर जिह्यातल्या काटोलमधून निवडून आले होते. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालींची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. त्याचबरोबर आपल्याला राज्यातील राजकारणात रस नसून राष्ट्रीय राजकारणात जाण्यास आपण इच्छुक असल्याचे सांगितले. विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा तुम्हाला विरोध आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते तुम्ही त्यांनाच विचारा, माझे विदर्भातील काँग्रेस नेत्यांविषयी मत चांगले आहे, अशी पुस्तीही देशमुख यांनी जोडली. काटोल मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या जागेवर भाजपने उमेदवार उभा करून निवडून आणून दाखवावाच, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

 विवेकाला साद घालणार

राज्यात विद्यार्थी, महिला, शेतकरी, दलित, मुस्लिम असे सर्वच घटक राज्यातील भाजप सरकारवर नाराज आहेत. पक्षातील आमदार व खासदारही नाराज आहेत. भाजप सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आपण नाराज आमदारांच्या अंतर्मनाला व विवेकबुद्धीला हात घालणारे पत्र पाठवणार आहोत, असे ते म्हणाले. आपण भाजपमधील असंतुष्ट आमदारांचे नेतृत्व करीत आहात का, असा प्रश्न त्यांना केला असता त्यांनी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. सध्या नाराजांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे, पण राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नाराजीचा विस्फोट होऊन ते राजीनामाही देतील, असा दावा त्यांनी केला.