
सामना ऑनलाईन, पारनेर
नगर जिल्ह्यातील पारनेर भागात दरोडे घालणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्र उर्फ रव्या काळे असं या दरोडेखोराचे नाव आहे. जवळपास १२ वर्ष हा दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की एक दाढी वाढवलेल्या साधू हा रव्याच असण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी तत्काळ चांभुर्डे भागात शोधाशोध करायला सुरूवात केली. खबऱ्याने जे वर्णन सांगितले होते, तशा वर्णनाचा माणूस पोलिसांना दिसला. हा साधू रव्याच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. रव्याविरूद्ध हत्या, दरोडा घालणे, कट रचणे यासारख्या अपराधांची शिरूर, शिक्रापूर, दौंड या तीन पोलीस ठाण्यात नोंद आहे.



























































